पुणे व्यापारी महासंघाची CM ठाकरेंकडे मागणी, म्हणाले – ’31 मेनंतर व्यापार्‍यांना दुकाने सुरु करण्यास परवानगी द्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असल्याने कडक निर्बंध लावले होते. परंतू गेल्या काही दिवसात पुण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे 31 मेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करून सर्व व्यापाऱ्यांना व्यापार सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबत व्यापारी महासंघातर्फे मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांना पत्र देण्यात आले आहे. पुण्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याने निर्बंध लावले होते. त्यानंतर राज्यात लॅाकडाउन जाहीर झाल्यापासून अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत पुण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. गुढी पाडवा, अक्षयतृतीया, ईद आदी महत्वाचे सण लॉकडाउन असल्याने व्यापाराविना गेले. त्यामुळे या दोन महिन्यात सुमारे 75 हजार कोटींचा फटका बसल्याचा दावा महासंघाने केला आहे. व्यापारी क्षेत्र तब्बल 2 महिन्याच्या लॉकडाउनमुळे अत्यंत अडचणीत आले आहे. व्यापाऱ्यांनी काहीही उत्पन्न नसताना 1-2 महिने कर्मचाऱ्याचे पगार दिले. मात्र यापुढे कर्मचाऱ्यांना घरबसल्या पगार देणे अशक्य झाले आहे. तसेच काम आणि उत्पन्नच नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आल्याचे पत्रात म्हटले आहे. व्यापार क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांना 3 महिन्याचे वीज बिल व बँक कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच स्थानिक मालमत्ता कर माफ करुण महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांना लवकरात लवकर भरीव आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशीही मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.