काय सांगता ! होय, महिन्यात 2 वेळा पगार, 30 हजारांपेक्षा कमी ‘सॅलरी’ असणार्‍यांना मिळणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभुमीवर 30 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांसाठी रिलायन्स कंपनीने महिन्यात दोन वेळेस पगार केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांना दिलासा मिळाला आहे.

रिलायंस इंडस्ट्रीजने मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची घोषणा ज्यांचे महिन्याचे वेतन 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्या कर्मचार्‍यांना महिन्यात दोन वेळेस पगार दिला जाईल अशी घोषणा रिलायन्स कंपनीने केली आहे. कमी वेतन असलेल्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा यासाठी कंपनीने त्यांना महिन्यातून दोन वेळेस वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अचानक काही समस्या उद्भवल्यास त्या कर्मचार्‍यांना आर्थिक चणचण भासणार नाही. समूहाच्या विविध कंपन्या, विभागात कार्यरत असलेले कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचार्‍यांना नियमित वेतन दिले जाईल, असेही रिलायंसने स्पष्ट केले आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढाकार घेत मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केले आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र 100 बेड्सची सुविधा करण्यात आलीये. तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी रिलायंस इंडस्ट्रीजकडून आर्थिक मदत देण्यात आली असून मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्सने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. रिलायंस इंडस्ट्रीजने दिवसाला एक लाख मास्क तयार करण्यापर्यंतची क्षमता वाढविली आहे. याशिवाय, रिलायंस फाऊंडेशनमार्फत विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरवले जाणार आहे.