Jio सर्वात मोठा धमाका करण्याच्या तयारीत, जाणून घ्या ग्राहकांना काय मिळणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओच्या माध्यमातून टेलिकॉम आणि जिओ फायबरच्या माध्यमातून ब्रॉडब्रँड क्षेत्रात मोठा ठसा उमटवल्यानंतर रिलायन्सने आता मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओमुळे इंटरनेटचे दर खाली आले. जीओशी स्पर्धा करण्यासाठी अन्य कंपन्यांनी सुद्धा दर कमी केले. त्याचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना झाला. जिओच्या माध्यमातून भारतीयांना स्वस्तात ४ जी इंटरनेट सेवा उपलब्ध करुन दिल्यावर आता रिलायन्सने ५ ची तयारी सुरु केली आहे.

रिलायन्सने ४ जी सुविधा असलेले अतिशय किफायतशीर फोन बाजरात आणले होते. त्याच पद्धतीने त्यांनी ५ जीसाठी तयारी सुरु केली आहे. या ५ जी फोनची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल. रिलायन्स जिओ यामध्ये यशस्वी झाल्यास टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजेल. सुरुवातीस या फोनची किंमत ५ हजार असेल, त्यानंतर मागणी आणि विक्री लक्षात घेऊन ती २,५०० किंवा ३,००० रुपयापर्यंत आणली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटलं की, भारतातील २० कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून कंपनी स्मार्टफोनच्या योजेनवर काम करत आहे. तसेच २ जी फोन वापरणाऱ्या ग्राहकांना ५ जी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य देखील कंपनीने ठेवलं आहे. म्हणूनच त्यांना स्वस्तात ५ जी स्मार्टफोन्स देण्याची तयारी कंपनीकडून करण्यात आली आहे.

देशात आता ५ जी स्मार्टफोनची किंमत अतिशय जास्त आहे. भारतात अजूनही ५ जी नेटवर्क सुरु झालेलं नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकन कंपनी रिलायन्स सोबत स्वस्त एँड्रॉईड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करेल, असे रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ४३ व्या सर्वसाधारण सभेत सांगितलं होते. त्यांनी केलेली घोषणा पाहता रिलायन्स ५ जी स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी मायक्रोसॉफ्टची मदत घेईल, असे मानले जाते. रिलायन्सने केंद्र सरकारकडे ५ जी नेटवर्क च्या चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप तरी रिलायन्सला परवानगी मिळालेली नाही.