Jio चा पुन्हा एकदा मोठा धमाका ! 5G ची ट्रायल घेणार, 4G सारखं पुन्हा फ्री देणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात 5 जी सेवा लॉन्च होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण मुकेश अंबानी यांनी नुकतेच चीनची मदत न घेता भारतात 5 जी लॉन्च करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे यावेळी कार्यक्रमात अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते. ट्रम्प यांनी देखील अंबानींचे अभिनंदन केले. जिओ आता त्यांनी स्वत: तयार केलेल्या 5 जी नेटवर्कची ट्रायल घेणार आहे.

जिओने 4 जी सेवा देशात लॉन्च करुन इंटरनेट क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला. सुरुवातीला मोफत त्यानंतर काही शे रुपयात इंटरनेट डाटा, कॉलिंग, जे महिन्याला 500 रुपये मोजले तरी भारतात कधी मिळाले नव्हते ते करुन दाखवले होते.

यामुळे ग्राहकांमध्ये जिओची लोकप्रियता वाढली. यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांकडून होणारी ग्राहकांनीच लूट थांबली. परंतु जिओचे नेटवर्क आता स्लो होत असल्याचा अनुभव अनेकांना आला.

जगात आता 5 जीची चर्चा सुरु झाली आहे. 4 जी पेक्षा 5 जीचा इंटरनेट स्पीड खूप वेगवान आहे. त्यामुळे जिओने देखील 5 जी नेटवर्क सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी जिओने चीनची थोडी देखील मदत घेतलेली नाही असा दावा केला आहे. 5 जीचे टेस्टिंग करण्यासाठी जिओने सरकारकडे परवानगी मागितली आहे.

जिओ 5 जी ची यशस्वी चाचणी झाल्यानंतर 5 जी उपकरणं अन्य कंपन्यांकडे देण्याची शक्यता आहे. यासाठी सॅमसंग, हुवावे, नोकिया, एरिक्सन या सारख्या कंपन्यांची मदत घेतली जाऊ शकते. जिओची सध्याची 4 जी उपकरणं सॅमसंग तयार करत आहे. ज्यामुळे 5 जी देखील सॅमसंगच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेले मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा केली. यावेळी अंबानी म्हणाले, भारतातील कोणताही छोटा उद्योजक पुढील काळात धीरुभाई अंबानी बनू शकतो. जिओ भारतात लॉन्च करण्यात आल्यानंतर इंटरनेटचे दर एकदम कमी झाले. भारतात यापूर्वी 1 जीबी डेटाची किंमत 300 ते 500 रुपये होती जी 12 ते 15 रुपये झाली असेही अंबानी म्हणाले.

देशातील प्रमुख कंपन्यापैकी असलेल्या व्होडाफोन आणि एअरटेल या कंपन्या तोट्यात आहेत यामुळे 5 जी स्पेक्ट्रम घेण्यासाठी या कंपन्या नाराज आहेत. अशात जिओचे 5 जी नेटवर्क लॉन्च झाले तर या कंपन्यांचे कंबरडे मोडेल. बीएसएनएलकडे सध्या 4 जी नाही. आता जिओ 4 जी सारखी 5 जीची 3 महिने मोफत ट्रायल घेणार आहे का हे पाहावे लागेल.