रिलायन्स रिटेलनं खरेदी केली अर्बन लॅडरमध्ये 96 % भागीदारी, दोघांमध्ये झाला 182 कोटी रूपयांचा व्यवहार

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची सहायक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने ऑनलाइन फर्नीचर स्टार्टअप अर्बन लॅडर होम डेकोर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडची 96 टक्के भागीदारी खरेदी केली आहे.

रिलायन्स आणि अर्बन लॅडरमध्ये हा व्यवहार 182.12 कोटी रूपयांत झाला. याशिवाय रिलायन्सकडे उर्वरित इक्विटी शेयर्स खरेदी करण्याचा पर्याय सुद्धा आहे. यातून कंपनीला अर्बन लॅडरची 100 टक्के शेयर होल्डिंग मिळू शकते.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड अर्बन लॅडरमध्ये 75 कोटी रूपयांची गुंतवणूक करेल. ही गुंतवणुक प्रक्रिया पूर्ण होण्यास डिसेंबर 2023 पर्यंतचा वेळ लागेल. भारतात अर्बन लॅडरची सुरूवात 17 फेब्रुवारी 2012 मध्ये झाली होती. आठ वर्ष जुनी स्टार्टअप कंपनी होम फर्नीचर आणि डेकोर उत्पादनांची विक्री डिजिटल प्लॅटफॉर्मवर करते. याशिवाय अर्बन लॅडरच्या भारतात अनेक शहरात किरकोळ स्टोअर्सची साखळी आहे.

2018 मध्ये ऑनलाइन फर्नीचर रिटेलर अर्बन लॅडरची व्हॅल्यू 1200 कोटी रूपये ठरवली गेली होती, जी 2019 मध्ये घसरून 750 कोटी रूपये झाली. स्टॉक एक्सचेंज फायलिंगनुसार 2019 मध्ये अर्बन लॅडरचा टर्नओव्हर 434 कोटी रूपये होता. यावर्षी कंपनीला 49.41 कोटी रूपयांचा नफा झाला.

रिलायन्स रिटेलने म्हटले, या गुंतवणुकीच्या द्वारे ग्रुपच्या डिजिटल आणि नवीन आर्थिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल आणि रिलायन्स ग्रुपद्वारे प्रदान करण्यात आलेल्या ग्राहक उत्पादनांच्या कक्षेतही वाढ होईल. याशिवाय ग्राहकांना रिटेल खरेदीमध्ये अधिक पर्याय मिळतील.

काही वर्षांपूर्वी अर्बन लॅडरला आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागला आहे. 2012 मध्ये आशीष गोयल आणि राजीव श्रीवत्स यांनी सुरू केलेल्या कंपनीला सिकोइया कॅपिटल, सॅफ पार्टनर्स, कलारी कॅपिटल आणि हेज फंड स्टीडव्यू कॅपिटलसारख्या प्रमुख उद्योगी भांडवल निधीतून 700 कोटी रूपयांपेक्षा जास्त पैसा मिळाला. परंतु यानंतर दोन वर्षांनी कंपनीला निधी वाढवण्यात अडचणी येऊ लागल्या. मागील वर्षी नोव्हेंबरला 15 कोटी रुपयांचा निधी मिळाला.