COVID-19 च्या रूग्णांना दिलासा ! आता ‘टेलिमेडिसीन’ देखील होणार ‘आरोग्य विम्या’मध्ये समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड-१९ रुग्णांना आरोग्य विम्याच्या बाबतीत दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना वैद्यकीय विमा पॉलिसीमध्ये टेलिमेडिसिन कव्हर करण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे आयआरडीएआयच्या सूचनेनुसारच कोरोनाच्या उपचारांचा समावेश आरोग्य विमा संरक्षणात करण्यात आला आहे. आता त्यात टेलिमेडिसिनचा समावेश केल्याने रुग्णांना आणखी दिलासा मिळेल.
काय आहे टेलिमेडिसिन सेवा ?
टेलिमेडिसिन म्हणजे रुग्णाला घरबसल्या डॉक्टर फोनवरून किंवा व्हॉट्सअॅपवर किंवा इतर कोणत्याही ऑनलाइन पद्धतीने सल्ला देतात. कोरोना काळात हे आणखी महत्त्वाचे बनले आहे, कारण आता बहुतेक डॉक्टर ऑनलाइन किंवा फोन कॉलद्वारे सेवा देत आहेत आणि पेटीएमद्वारे किंवा इतर मार्गाने त्याचे शुल्क आकारतात.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेलीमेडिसिनचा समावेश ‘हेल्थकेअर सर्व्हिस डिलिव्हरी’ मध्ये केला आहे, ज्यामध्ये सर्व आरोग्य सेवा व्यावसायिक सूचना आणि संप्रेषण तंत्र वापरुन लोकांच्या हितासाठी काम करतात.
आयआरडीएआय काय म्हणाले?
आयआरडीएआयने म्हटले आहे की, ‘विमा कंपन्यांना टेलिमेडिसिन कव्हर करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये पॉलिसी कराराच्या अटी व शर्तींनुसार वैद्यकीय प्रॅक्टिशनरकडून सल्लामसलत करण्यास परवानगी दिली आहे. टेलिमेडिसिनला परवानगी देण्याची तरतूद क्लेम सेटलमेंटचा एक भाग असावी आणि ती स्वतंत्रपणे भरण्याची आवश्यकता नसावी.’
आयआरडीएआयने सांगितले की, टेलिमेडिसिन सेवा २५ मार्च रोजी जारी केलेल्या टेलिमेडिसिन सराव मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने असावी. यामुळे अशा अनेक आरोग्य विमा पॉलिसीधारकांना दिलासा मिळाला आहे, जे या कोरोना काळात डॉक्टरांचा ऑनलाइन किंवा फोन कॉलद्वारे सल्ला घेत आहेत, जेणेकरून ते कोणाच्याही संपर्कात येणार नाहीत. यामुळे कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या लोकांना देखील आराम मिळेल, ज्यांना सरकारने होम क्वारंटाइन करून उपचार करण्यास सांगितले आहे.
बरीच खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांना होम केअर पॅकेजेस प्रदान करत आहेत, ज्या अंतर्गत घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला आणि नर्स पुरवल्या जात आहेत.