भाजप खासदार स्वामींना उच्च न्यायालयाकडून ‘दिलासा’ मिळणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी जात पडताळणी समितीने जातीचा दाखला अवैध ठरवून रद्द केल्यामुळे खासदारकी धोक्यात आलेले सोलापूर भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई हायकोर्टाने भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या दाखल्याच्या प्रश्नावर पुन्हा सुनावणी घेऊन विशिष्ट कालमर्यादेत निर्णय देण्याचे आम्ही जात पडताळणी समितीला निर्देश देऊ तसेच या संदर्भात सर्व पक्षकारांच्या वकिलांना त्यांचे वेळापत्रक उद्या गुरुवारी देण्यात कोर्टाने सांगितलं आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांनी विजय मिळवला होता. हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव असून, स्वामी यांनी बेडाजंगम या अनुसूचित जातीचा दाखला सादर करून निवडणूक लढली होती. मात्र जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार मिलिंद मुळे यांनी नोंदविल्यानंतर जात पडताळणी समितीने त्याची चौकशी करून सुनावणीअंती समितीने २४ फेब्रुवारी रोजी स्वामींचा दाखला अवैध ठरवत रद्द केला. त्यामुळे खासदारकी धोक्यात आल्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामींनी अँड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत तातडीने रीत याचिका दाखल करून उच्च न्यायालयात धाव घेतली होती.