September 2020 Planetary Overview : सप्टेंबर महिन्यात तब्बल 7 ग्रहांचं राशीपरिवर्तन ! कुणाचं चलन कसे असणार ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सप्टेंबर महिन्यात तब्बल 7 ग्रहांचं राशीपरिवर्तन होणार आहे. ऑगस्टप्रमाणे सप्टेंबर महिनादेखील ग्रह नक्षत्रांच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. ज्योतीषीय गणना आणि पंचांगानुसार सप्टेंबर महिन्यात गुरू, सुर्य, राहु, केतू, शुक्र, बुध आणि मंगळ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे.

यातील काही ग्रहांचं चलन मर्गी असेल तर काही ग्रह वक्री चलनानं राशीबदल करतील. या एकंदर ग्रहांच्या स्थितीच्या चलनाचा आणि राशीपरिवर्तनाचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि प्रतिकूल असा दोन्ही अर्थानं प्रभाव पडत असतो. यातील काही घटना, प्रसंग आपल्यासाठी अगदी शुभ ठरतात. परंतु काही व्यवहार मात्र सावधगिरी बाळगून करणं हिताचं ठरतं. या ग्रहांचे सप्टेंबर महिन्यात चलन कसे असेल हे आपण जाणून घेऊयात.

1) सूर्य – ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह सप्टेंबर महिन्यात सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य हा करिअर, सुख समृद्धी, प्रगती यांचा कारक मानला जातो. बुधवारी 16 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत विराजमान होईल. सुर्याचे हे राशीपरिवर्तन बहुतांश राशीच्या व्यक्तींसाठी शुभ मानलं जातं. ज्यांच्या कुंडलीत सुर्याची दशा शुभ आहे अशांसाठी सुर्याचा सिंह राशीतून कन्या राशीत झालेला प्रवेश हा लाभदायक ठरेल.

2) मंगळ – उग्र स्वभावाचा मानला गेलेला मंगळ स्वामित्व असलेल्या मेष राशीत वक्री जाणार आहे. गुरूवार 10 सप्टेंबर 2020 रोजी मंगळ मेष राशीत वक्री जाणार आहे आणि मीन राशीत वक्री प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाला सेनापती मानलं गेलं आहे. हे वक्री चलन काही राशींसाठी प्रतिकूल मानले जात असून वक्री चलन कालावधीत काही समस्यांना सामोरं जावं लागू शकेल.

3) बुध – बुध हा बुद्धीकारक मानला जातो. हा ग्रह आपलं स्वामित्व असलेल्या कन्या राशीत विराजमान होत आहे. बुधवारी 2 सप्टेंबर 2020 रोजी बुध मार्गी चलनानं सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध 22 सप्टेंबर 2020 रोजी मार्गी चलनानं तुळ राशीत प्रवेश करेल.

4) गुरू – ग्रहांचा देवता मानला गेलेला गुरू आपलं स्वामित्व असलेल्या धनु राशीत मार्गी होणार आहे. रविवारी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुरु धनु राशीत मार्गी होईल. गुरू करिअर आणि सुख, समृद्धीकारक मानला गेला आहे. याचं मार्गी चलन अनेक राशींच्या व्यक्तीसाठी लाभदायक ठरेल.

5) शुक्र – वैवाहिक जीवन, सौंदर्य, प्रेमसंबंधांचा कारक आणि सेक्स लाईफ प्रभावित करणारा शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. मंगळवारी 1 सप्टेंबर 2020 रोजी मिथुन राशीत असलेला शुक्र मार्गी चलनानं कर्क राशीत विराजमान होणार आहे. सोमवार 28 सप्टेंबर 2020 रोजी शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत विराजमान होईल. याचं मार्गी चलन बहुतांश राशींच्या व्यक्तींना लाभदायक ठरेल.

6) राहु – क्रूर ग्रहांपैकी एक मानला जाणारा राहु सप्टेंबर महिन्यात वक्री चलनानं वृषभ राशीत विराजमान होणार आहे. बुधवारी 23 सप्टेंबर 2020 रोजी मिथुन राशीतून वक्री चलनानं शुक्राचं स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत राहु प्रवेश करणार आहे. राहु छाया ग्रह मानला जातो. व्यक्तीची बुद्धी भ्रमित करण्याची क्षमता राहुत असल्याचं सांगितलं जातं. राहुचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रभाव पाहायला मिळू शकतात. वृषभ राशीत राहु विराजमान झाल्यानंतर बहुतांश राशीच्या व्यक्तींना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

7) केतु – केतु हा वैदिक ज्योतिषशास्त्रात मायावी ग्रह मानला जातो. बुधवारी दि 23 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी धनु राशीत असलेला केतु वक्री चलनानं वृश्चिक राशीत विराजमान होणार आहे. केतुच्या राशीपरिवर्तनाचा सर्व राशींवर सखोल प्रभाव राहिल. केतु मोक्ष, अध्यात्म आणि वैराग्याचा कारक मानला जातो. ज्यांच्यावर केतुची कृपा होते त्या व्यक्ती मालामाल होतात. नाहीतर राजाचाही रंक होतो अशी मान्यता आहे. इतर सर्व ग्रह वर्क्री आणि मार्गी चलनानं राशीपरिवर्तन करत असतात. परंतु राहु आणि केतु हे दोनच ग्रह असे आहेत जे कायम वक्री चलनानं राशीबदल करत असतात.