Inspiring story : डोळे ‘दान’ करून हा तरुण स्वतः अंध का झाला ? वाचा ही प्रेरणादायी कहाणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  आपण सर्वांनी परोपकाराच्या अनेक कथा ऐकल्या असतील ज्यातून आपल्याला बोध मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक कहाणी सांगणार आहोत जी तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल. या कहाणीतून मिळणारा बोध घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात आदर्श निर्माण करू शकता.

एक तरुणी होती, एका दुर्घटनेत तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. या कारणामुळे ती नेहमी हताश आणि निराश राहायची. तिला तिचं आयुष्य नको नकोसं झालं होतं. तिला नेहमी वाटायचं की ती दृष्टिहीन असल्यामुळे तिच्यावर कोणी प्रेम करत नाही. समाजात जो मान पान मिळायला पाहिजे तो मिळत नाही असं तिला वाटायचं. दरम्यान एका तरुणाशी तिची भेट झाली. तो तरुण त्या दृष्टिहीन मुलीची काळजी घेऊ लागला.

त्या तरुणाने दिलेल्या प्रेमामुळे तिला जगण्याची प्रेरणा मिळाली. आता ती नव्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहत होती. तिला त्या तरुणाचं बोलणं आणि त्याचा आवाज खूप आवडायचा. एका दिवशी तो तरुण त्या तरुणीला म्हणाला, काहीही झालं तरी तुझी दृष्टी परत मिळवून देईन. त्याने वचन दिलं कि तू तुझ्या डोळ्याने हे जग पाहू शकणार आहेस.

एका दिवशी तो तरुण त्या तरुणीला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेला. त्याने तिच्या डोळ्याचं ऑपरेशन एका नामवंत सर्जन कडून करवून घेतलं. ऑपरेशन नंतर त्या तरुणीच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. जेव्हा तिच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात येईल तेव्हा सर्वात आधी त्या तरुणाला पाहायची तिची इच्छा होती, ज्याने तिला जगण्याची प्रेरणा दिली होती.

ती वेळ आली, त्या तरुणीच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. तिने तिच्या इच्छेनुसार त्या तरुणाला सर्वात आधी पाहिले. ती त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाली कारण तो दृष्टिहीन होता. त्याला पाहून तिच्या स्वप्नांवर पाणी पडलं. ती म्हणाली एका दृष्टिहीन मुलाशी मी लग्न नाही करू शकत. त्याला जेव्हा हे समजलं तेव्हा तो दुःखी झाला नाही. तो म्हणाला, आता तू जग पाहू शकतेस, खूप आनंद घेऊ शकतेस. माझा उद्देश पूर्ण झाला, मी निघतो. हां.. माझ्या डोळ्यांची काळजी घे…

कथेचा बोध

एखाद्याचं भलं करणारा त्याच्या बदल्यात काय मिळेल याचा विचार कधीच करत नाही. त्या तरुणाने स्वतःची पर्वा न करता त्या मुलीला डोळे दान केले, आणि दिलेलं वचन पूर्ण केलं.