…म्हणून राज्यातील धार्मिकस्थळे बंदच, सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे धार्मिकस्थळे खुली न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आले. गणेशोत्सवात बाजारपेठांमध्ये मास्कचा वापर न करणे, अंतर नियमाचे मोठया प्रमाणात उल्लंघन झाल्याच्या अनुभवातून धडा घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

निर्बंधांसह धार्मिकस्थळे खुली करण्यात आली तरी ते व्यवहार्य ठरणार नाही, असेही सरकारतर्फे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर अन्य राज्यांत धार्मिकस्थळे खुली केली जात असताना राज्यात मात्र त्याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे धार्मिकस्थळे खुली करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. सरकारतर्फे या मागणीचा विचार केला जात होता. मात्र राज्यातील सध्याची करोनाची स्थिती पाहता त्यात सुधारणा होईपर्यंत धार्मिकस्थळे खुली न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. धार्मिकस्थळांबाबतच्या निर्णयाविषयीचे प्रतिज्ञापत्रही राज्य सरकारने न्यायालयात सादर केले.