Video : ’48 तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ 16 कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा’; किरीट सोमय्यांचा मालिकांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरु आहे. तर यावरून महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरवाल तर कंपन्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने १६ कंपन्यांना दिल्याचा दावा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. या दाव्यावरून त्या १६ कंपन्या कोणत्या यासंदर्भात खुलासा करावा असे भाजपने मंत्री नवाब मलिकांना म्हटलं होत.

या प्रकरणावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे कि, महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. आता ४८ तास झाले कुठे आहे त्या १६ कंपन्यांची यादी? आणि मोदी सरकारने प्रतिबंध केलेले पत्र? खोटं बोलणं थांबवा आणि स्टंटबाजी थांबवा. लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा असा टोला लगावत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, मंत्री नवाब मलिक म्हणाले होते कि, केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्र सरकार त्यास नकार दिला आहे. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. तर राज्यसरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे.

जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा सुद्धा मंत्री नवाब मलिक यांनी दिला होता.