Pravin Darekar : ‘कोट्यवधींच्या कमिशनचे नुकसान होईल म्हणून ठाकरे सरकारने कुभांड रचले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना परिस्थिती बिकट होत आहे. त्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘लोकांच्या जीवापेक्षा स्वत: अहंकारातच जास्त रस आहे. रेमडेसिव्हिर टेंडर काढून कोट्यवधीच्या कमिशनचे नुकसान होईल म्हणून कुभांड रचले गेले’, असा आरोपही त्यांनी केला.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. हे समजल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावरून राजकारण तापले आहे. त्यानंतर आता प्रविण दरेकर यांनी यावर भाष्य करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘ब्रुक फार्मा कंपनीकडून मिळणारा साठा हा राज्य सरकारकडेच जाणार होता. हे आम्ही आधीपासून बोलत होतो. आज स्वत: अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी खुलासा केल्याने ठाकरे सरकार तोंडघशी पडले आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित मंत्री होते. ब्रुक फार्मा कंपनीचे अधिकाऱ्यांनी FDA खात्याचे सचिव, अधिकारी यांना कल्पना दिली होती. शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत कंपनीने रेमडेसिव्हिरचा साठा राज्य सरकारला देणार असल्याचे सांगितले’.

दरम्यान, याबाबत डॉ. शिंगणे यांनी खुलासा केल्यानंतर ठाकरे सरकार तोंडघशी पडले आहे. जे मंत्री किंवा महाविकास आघाडीचे नेते रेमडेसिव्हिरबाबत भाजपबाबतीत साप-साप करत भुई थोपटत होते, त्यांचे थोबाड फुटलेले आहे. तसेच डॉ. शिंगणे यांनी जे सांगितले आहे, त्यामुळे या सर्वांचा डाव उघड झाला, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.