मोठी बातमी ! कोरोनावर Remdesivir औषध प्रभावी नाही – दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. डी. ए. राणा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. अशातच कोरोना रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा पद्धतीचा वापर बंद केला आहे. त्यानंतर आता कोरोना उपचारात वरदान ठरलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन देखील उपचारपद्धतीतून वगळण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमेडेसीवीर इंजेक्शनचा फायदा झाल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे गंगाराम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. डी. ए. राणा यांनी म्हटले आहे.

कोरोनाबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल टास्क फोर्सची बैठक झाली. बैठकीत प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार पद्धतीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये याचा अयोग्यपद्धतीने वापर झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता रेमडेसीवीरसंदर्भातही लवकरच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या उपचारपद्धतीकडे बारकाईने पाहिल्यास, रेमेडेसीवीर इंजेक्शनामुळे रुग्णांना बरे होण्यासाठी मोठा फायदा झाल्याचा कुठेही सिद्ध झाले नाही. हे इंजेक्शन प्रभावी ठरल्यांचा कुठेही वस्तूनिष्ठ पुरावा मिळाला नाही. त्यामुळे रेमडेसीवीर इंजेक्शनही कोविडच्या उपचारपद्धतीतून वगळण्याची शक्यता असल्याचे डॉ. राणा यांनी म्हटले आहे. दरम्यान सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी केवळ 3 औषधे महत्त्वाची व प्रभावशाली बनून काम करत आहेत. कोरोना महामारीवरील उपायांसाठी सातत्याने नवनवीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न वैद्यकीय यंत्रणा करत आहे. आम्ही सर्वचजण यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे डॉ. राणा यांनी म्हटले आहे.