केंद्रीय मंत्र्याची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका, म्हणाले – ‘उध्दव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारण थांबवावं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिकट होत आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हिर, व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता जाणवत आहे. त्यावरून राज्य सरकारकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांनी यावर भाष्य करत मोदी सरकारची बाजू मांडली. ‘उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी’, असे म्हटले आहे.

कोरोना लसींचा तुटवडा, व्हेंटिलेटर बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरता या बाबींवरून सरकारकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता पियूष गोयल यांनी याचा समाचार घेत ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंचे राजकारण पाहून दु:ख झाले. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून, उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजनही वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे’.

दरम्यान, ऑक्सिजनच्या तुटवड्यावर बोलताना गोयल म्हणाले, ‘आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून, त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे. आपण 110 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून, उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजनही वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला आहे.