Remdesivir : मला ‘हे’ वाचून धक्काच बसला, राज ठाकरेंचे PM मोदींना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर सारख्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत:करणार आहे. ही बातमी वाचून मला धक्काच बसला. केंद्राने रेमडेसिवीरचं व्यवस्थापन स्वत:कडे ठेवण्याचे प्रयोजन काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केला आहे.

राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेलं हे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून रेमडेसिवीर आणि इतर औषधं, तसेच कोरोनासाठी आवश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावं अशी मागणी केली आहे. तसेच माझ्या विनंतीचा सकारात्मक विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढत आहेत. काल तर देशात रुग्णसंख्येने तीन लाखांचा आकडा मागे टाकला. मृत्यूची आकडेही चिंताजनक आहेत. प्रेतांच्या रांगाच्या रांगा असलेली गुजरातमधील आणि इतर राज्यातील दृष्य पाहिली. ती मनातून जात नाहीत. ही वेळ खरंच भीषण आहे. राजकारणाची मुळीच नाही. आत्ता देशातल्या सर्वांनी एकत्र येऊन ह्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत केंद्राची भूमिका ही सहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. राज्य सरकारांची यंत्रणा प्रत्यक्षात काम करत आहे. त्या त्या राज्यांमध्ये राज्य सरकारचा आरोग्य विभाग, तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोक यात अग्रभागी आहेत. लोकांचे प्राण वाचवणं आणि त्यांना योग्य उपचार देणे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असे असताना केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत: करणार आहे. मला हे वाचून धक्काच बसला.

आपण नुकतेच देशाला उद्देशून केलेले भाषण मी ऐकलं. त्यात आपण राज्य सरकारांना काही सूचना केल्या आहेत आणि या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय काय पावलं उचलली पाहिजेत ह्याचं मार्गदर्शन देखील केले आहे. त्यानंतर मग रेमडेसिवीर सारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्राने स्वत:कडे ठेवण्याचे प्रयोजन काय ? केंद्रानं रेमडेसिविरच्या वितरणाची यंत्रणा स्वत:कडे ठेवू नये. रेमडेसिविर कस घ्यायचं, कुठं, कसं वितरित करायचं ह्याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही. अशामुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या यंत्रणांवरचा अविश्वास दिसून येतो, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

भारताच्या इतिहासात इतकं मोठं आरोग्य संकट गेल्या 100 वर्षात आलं नसावं. हे आव्हान म्हणूनच फार मोठं आहे. तिथे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन समन्वयानं, सहकार्यानं काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथे आपल्याला अधिक चागंल्या पद्धतीनं उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या संविधानानं दिलेल्या संघराज्य पद्धतीचा आत्माही तोच आहे, याची आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली आहे. माझ्या विनंतीचा सकारात्मक विचार करुन आपण राज्यांना प्रशासकीय स्वातंत्र्य द्याल, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.