पर्रिकर पुण्यतिथी : सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, स्कुटरवर भाजी खरेदीला जाणारा ‘मुख्यमंत्री’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राजकारण आणि समाजकारण रक्तातच असावे लागते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गोव्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी झोकून देत काम करणारे मुख्यमंत्री, सामान्यांमध्ये मिसळणारा, स्कुटरवरुन ऑफिसला जाणारा, दिवसाला 15-16 तास काम करणारा नेता साधेपणाचे दुसरे नाव म्हणजे मनोहर पर्रिकर आहे. त्यांची आज जयंती असून भारतीय जनता पक्षासह गोव्यात त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात येत आहे.

पत्नीसोबर भाजी खरेदसाठी मंडईत चालणारा, स्कुटरवरुन ऑफिसला जाणारा, दिवसाला 15-16 तास काम करणारा नेता गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची आज पुण्यतिथी. 2019 साली आजच्याच दिवशी वयाच्या 63 वर्षी त्यांचे निधन झाले होते. अतिशय हुशार आणि अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. अखेरच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते.

2018 पासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर सामान्यांमधील असामान्य नेतृत्व गमावल्याची भावना भारतीयांनी व्यक्त केली होती. अनेक नेत्यांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी ट्विटवरुन पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली होती. पर्रिकर हे त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच साधेपणासाठीही ओळखले जायचे. मुख्यमंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्यांचे साधे रहाणीमान कायमच राहिले. मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते अनेक वर्ष वडीलोपार्जित घरातच राहत होते. अनेकदा गोवेकरांनी पर्रिकरांना स्कुटवरुन ऑफिसला जाताना पाहिले आहे. त्यांच्या अशाच साधेपणाचे अनेक किस्से गोवेकरांच्या चर्चेमध्ये सहज ऐकायला मिळतात.

पर्रिकरांच्या काही प्रसिद्ध किस्यांवर टाकलेली नजर
मुलाच्या लग्नात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या लग्नातील जवळजवळ सर्व पाहुणे सूट-बूटांमध्ये मध्ये आले होते. तर मुलाचे वडील म्हणजेच मनोहर पर्रीकर मात्र हाफ शर्ट आणि साध्या पॅन्ट मध्ये सर्वांचे स्वागत करताना दिसले.

मुख्यमंत्री असतानाही पर्रिकर सरकारी गाड्यांच्या ताफ्याऐवजी चक्क स्कुटरवरुन आपल्या कार्यालयात जात. अनेकदा गोवेकरांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुचाकीवरुन कामाला जाताना पाहिले आहे. त्यांचे नियोजन कौशल्य अफाट होते. बर्‍याच वेळेला ते काम पूर्ण होईपर्यंत कार्यालयातच असायचे. पर्रिकर दिवसाला 15-16 तास काम करायचे. एकदा अर्ध्या रात्रीपर्यंत पर्रिकर त्यांचे ओएसडी असणारे (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) गिरीराज वर्नेकर यांच्या सोबत एक प्रकल्पावर चर्चा करत बसले होते. वेळेचा अंदाज आल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आली.

जाताना वर्नेकरांनी, ‘उद्या कितीला येऊ?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा पर्रीकरांचे, ‘उद्या थोड्या उशिरा येऊ शकता, सकाळी 6:30 पर्यंत आलात तरी चालेल,’ हे उत्तर ऐकून वर्नेकरांना आश्चर्य वाटले. सकाळी जेव्हा वर्नेकर 6:15 ला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना तेथील अधिकार्‍यांनी ‘ मुख्यमंत्री पहाटे 5:15 वाजेपासूनच ऑफिसमध्ये काम करत असल्याचे सांगितले. 2004 च्या गोवा फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात पर्रीकर पोलिसांसोबत कार्यक्रम स्थळाबाहेरील वाहतुक नियंत्रण करण्यात व्यस्त होते.

अनेकदा पर्रिकर गोव्यातील आपल्या आवडत्या ठिकाणी जाऊन पोटपुजा करुन यायचे. 2012 साली पर्रिकर तिसर्‍यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पर्रीकर यांनी अभिनंदन करण्यासाठी मंचावर आलेल्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करत शुभेच्छा स्वीकारल्या. 2016 मध्ये पर्रिकर संरक्षण मंत्री असताना मुंबई आयआयटीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना त्यांचे एक जुने शिक्षक भेटले असता मंचावरच ते शिक्षकांच्या पाया पडले होते.