स्मृती दिन विशेष : महाकवी नामदेव ढसाळ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (सुरज शेंडगे ) – वास्तवाची जळमटे आपल्या कवितेतून मांडणारा थोर महाकवी आणि सत्याला काव्याचे मूर्त रूप देणारा शबदांचा जादूगार नामदेव ढसाळ यांचा आज स्मृती दिन आहे. १५ जानेवारी २०१४ साली ते आपल्यातून निघून गेले मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वाने शोषित समाजाचे अश्रू पुसण्याचे लाखमोलाचे काम केले आहे. दलित पँथरच्या माध्यमातून त्यांनी दलितांची राज्यव्यापी संघटना उभारून दलितांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केले. त्यांच्या दलित पँथर चळवळीतूनच रामदास आठवले हे नेतृत्व उदयाला आले.

मोठ्या कवीने नामदेव ढसाळ यांना विचारले तुमची जात कोणती 
नामदेव ढसाळ हे उदरनिर्वाह करण्यासाठी टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करत असत. त्यांना  एके दिवशी माहिती मिळाली कि भारतमाता चित्रपटगृहात ग.दि. माडगूळकर आले आहेत. नामदेव ढसाळ त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी गदिमांना आपली कवितेची वही दाखवली असता माडगूळकर त्यांच्या कविता वाचून प्रभावित झाले मात्र त्यांनी नामदेव ढसाळ यांना तुम्ही कोणत्या जातीचे असा प्रश्न केला. तेव्हा नामदेव ढसाळ यांना खूप वाईट वाटले.

जातीअंताच्या आणि परंपरावादाच्या विरोधात लिहणारा कवी   
जातीमुळे मानवता जात केंद्रित बनली आहे या मतावर नामदेव ढसाळ ठाम होते त्यांनी उभ्या आयुष्यात कधीच कोणत्या जातीचे प्रतिनिधित्व केले नाही. अखिल मानवतेसाठी लिहणारा कवी आणि समाजसेवक म्हणून त्यांचा लौकिक होता.

दलित पँथरची स्थापना 
सत्तरच्या दशकात अचानक देशात जातीवादाचे काळे वादळ उठले होते. अशातच दलित समाजावर होणार अन्याय हि वाढीस लागला होता. तेव्हा दलित समाजातील बंडखोर युवकांनी दलित पँथर संघटना स्थापन करण्याचे ठरवले. जी संघटना दलितांवर होणाऱ्या अन्यायासाठी लढा देऊ शकेल. मुंबई या बाबत  वाटाघाटी होत असतानाच पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात बावडा गावी दलितांना वाळीत टाकण्याचा प्रकार घडला. त्या ठिकाणी नामदेव ढसाळ आणि दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी भेट दिली आणि या ठिकाणी भेट दिल्या नंतर दलित पँथरच्या स्थापनेचा निर्धार सत्यात उतरला. २९ मे १९७२ साली दलित पँथरची स्थापना करण्यात आली.

ढसाळांची कविता कडव्या सत्याचे प्रतिनिधित्व करणारी 

‘मी नाही लपवले सत्य। मी नाही चोरली जात
जे काही होते आणि आहे ते मी खुल्लमखु्ल्ला सांगितले
अंगावरील सर्व लक्तरे फेकून
मी झालो गर्भाशयातून बाहेर पडणाऱ्या लहानुल्या मुलासारखा नवा’
हि कविता त्यांच्यातील प्रांजळ कवी आपणाला दाखवून देतो. त्यांची कविता माणसाला आत्मभान आणणारी होती. सत्याच्या समीप नेणारी होती. अशाच एका वास्तववादी कवितेत नामदेव ढसाळ म्हणतात,
‘ज्या भाकरीने सदासर्वकाळ सतावले
ती भाकरी करू शकली नाही माझा पराभव
मी उजागर केली जगण्यावरची निष्ठा
आणि लिहिले जगण्याचे शुद्ध अभंग’

चळवळ सक्रिय ठेवण्यासाठी प्रकाशात आणल्या नाहीत प्रेम कविता 

नामदेव ढसाळ यांनी अशा विषयांना कवितेच्या माध्यमातून हात घातला कि त्या विषयांना पूर्वी कोणी स्पर्श करणेही पसंत केले नव्हते त्यांचा  १९७३ साली गोलपिठा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्या कविता संग्रहात त्यांनी वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलांचे दुःख दाखवून दिले आहे. नामदेव ढसाळांच्या लेखणीतून निघणाऱ्या कविता रसिकांच्या काळजाचा वेध घेत होत्या. यामुळेच त्यांच्या कविता इंग्रजी,हिंदी,फ्रेंच,जर्मन भाषेत भाषांतरित झाल्या आहेत. जागतिक स्तरावर नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे रसिक आजही आपणास पाहण्यास मिळतात. शेवटी त्यांनीच लिहलेली एक प्रेम कविता,

तिची आस होती मी बरबाद व्हावे
बरसत्या दवाचे हि आसू मळावे
शुद्धीत चालताना तरी तोल जावा
आणि फुंकरीने वृक्ष उन्मळावा
पंख बुलबुलाचे तुटूनी पडावे
तिची आस होती मी बरबाद व्हावे