रोहित पाटलांकडून RR आबांच्या आठवणींना उजाळा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आबांनी मला विचारलं तू कोण होणार तेव्हा मला गाडी चालवायला आवडायची मग मी म्हणालो, मला ड्रायव्हर व्हायचं आहे. आबा म्हणाले ठीक आहे तुला ड्रायव्हर करु अशी एक आठवण आर.आर. पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगितली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील उर्फ आबा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आबांच्या आठवणीबद्दल सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील आणि मुलगा रोहित पाटील यांच्याशी सोशल मीडियावरून संवाद साधला. त्यावेळी आर.आर. आबांच्या जुन्या आठवणींमध्ये सगळेच भावूक झाले.

सुप्रिया सुळेंनी रोहितला विचारलं की लहानपणी आबांनी कधी तुला विचारलं होतं का मोठेपणी काय बनायचं आहे. त्यावर रोहित पाटील म्हणाले, आबांनी मला विचारल होतं, तू पुढे जाऊन काय होणार ? तेव्हा मी लहान होतो, तेव्हा मला गाडी चालवायला आवडायची म्हणून मी ड्रायव्हर व्हायचं आहे असे सांगितले. त्यानंतर मी मोठा झालो, पोलिसांना पाहू लागलो तेव्हा मी परत सांगितलं, मला पोलीस बनायचं आहे. तेव्हा आबा म्हणाले, त्यासाठी तुला उंची वाढवावी लागेल, तू माझ्या एवढा राहिला तर तुला पोलीस बनता येणार नाही. पण आता यशस्वी वकील बनायचं आहे असं सांगितलं.

आबांनी मुलांना जिल्हा परिषदेत टाकायचं हा निर्णय घेतला तेव्हा सुमनताई तुमची काय भावना होती, यावर सुमन पाटील म्हणाल्या, आबांच्या प्रत्येक निर्णयात मी साथ दिली. मुलं हुशार असली तरी कुठेही शिकली तरी पुढे जातात, असं आबा म्हणायचे. यावेळी रोहित पाटलांनी सांगितलं की, स्मिता दिदीनं आम्हाला इंग्रजी माध्यमात टाकलं का नाही ? असं विचारलं, तेव्हा आबांनी प्रश्न केला की, तुमचं काय नुकसान झालं ? मुलं हुशार असली की त्यांना कोणत्याही माध्यमातून शिकली तरी काही फरक पडत नाही, असं आबा म्हणाल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.

यावेळी रोहित पाटील यांनी आबांच्या आठवणी सांगताना म्हणाले, आबा घरी कधीच चिडले नाहीत, रागावले नाहीत. मुलांबरोबर गप्पा मारायचे गावी आल्यानंतर आबा घरी आल्यानंतर ते आम्हाला घेऊन रानात जायचे. आम्ही हुरडा खायचो. त्यावेळेस ते फक्त आम्हाला वेळ द्यायचे. आबांनी मुलांना कधीही शिक्षा केली नाही. त्यांच्यावर कधीही रागावले नाहीत. रोहीत लहान असताना त्यांच्यापुढे जात नव्हता. आबा जसे रागीट नव्हते, तसाच रोहित आहे, असे सुमन पाटील म्हणाल्या.

त्यानंतर आबांनी कधी अभ्यास घेतला नाही
मुंबईला असताना आबांचा फोन यायचा तेव्हा कसा आहेस, काय करतोय आणि मार्क्स किती असा नेहमीचा प्रश्न विचारायचे. आबा स्वत:हून कधी रागावले नाहीत. ते एकदा गावी आले होते, तेव्हा मी शाळेतून घरी आलो होतो. त्यांनी आमच्या भावंडांचा अभ्यास घ्यायचं ठरवलं. मी गणितात कमकुवत होतो. तेव्हा आबांनी मझ्याकडून 10 गणिताची उदाहरणं सोडवून घेतली. माझा सगळा होमवर्क सोडवून घेतला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मास्तरांनी माझी नोटबुक फाडली होती, शिकवलेली सगळी गणितं चुकली होती. त्यानंतर आबांनी कधीच अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला नाही, असा किस्सा यावेळी रोहित यांनी सांगितला.