‘त्या’ खटल्यातून माझे नाव काढा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातून माझे नाव वगळण्यात यावे, असा अर्ज या खून खटल्यातील क्रमांक दोनचा संशयित आरोपी राजेश पाटील याने अलिबाग न्यायालयात केला आहे. दरम्यान, कुंदन भंडारीने जामिनासाठी दुसऱ्यांदा अर्ज केला आहे. संशयित आरोपींनी कारागृह बदलण्याची मागणी केली आहे. यावर ८ जानेवारीला न्यायालयात अंतिम निर्णय होणार आहे.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक अभय कुरंदकर व राजेश पाटील हे दोघे तळोजा कारागृहात आहेत, तर कुंदन भंडारी ठाणे कारागृहात आहे. फळणीकर अलिबाग कारागृहात बंदिस्त आहेत. सुनावणीला जाताना त्रास होत असल्याच्या कारणावरून जेल बदलावे, एकत्र ठेवावे अशी मागणी होत आहे. त्यासाठी संशयितांच्या वकिलांनी अलिबाग न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी म्हणणे मांडले.

सरकारी वकिलांनी कारागृह बदलण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींना न्यायालयात हजर केले जावे, असा मुद्दा मांडला. संशयितांच्या वकिलांनी यावरही आपले मत मांडले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने ८ जानेवारीला अंतिम निर्णय देण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, या खटल्यातून आपले नाव काढून टाकले जावे, असा अर्ज राजेश पाटील याने न्यायालयात केला आहे, तर कुंदन भंडारीनेही दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने एक वर्षात खटल्याचे कामकाज संपवण्याचे आदेश अलिबाग न्यायालयास दिले आहेत; मात्र खटल्याच्या कामकाजात अडथळे आणण्यासाठीच संशयित आरोपी प्रयत्न करत आहेत; मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे योग्य तो निर्णय होईल, असे गोरे-बिद्रे कुटुंबीयांनी म्हटले आहे.