कोरोना लस प्रमाणपत्रावरील PM नरेंद्र मोदींचे असलेले छायाचित्र काढण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात सुरू असल्याने या राज्यांमधील कोरोना व्हायरस लस प्रमाणपत्रांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिला आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने या आठवड्याच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत पंतप्रधानांकडून अधिकृत यंत्रणेचा सरळसरळ गैरवापर होत असल्याचा आरोप केला होता.

या संदर्भात पश्चिम बंगाल निवडणूक अधिकार्‍यांकडे सर्वप्रथम केंद्रीय निवडणूक आयोगाने अहवाल मागविला आणि त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला हे फोटो काढण्यास सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदान होणार्‍या राज्यांच्या लसीकरणाच्या प्रमाणावर पंतप्रधान मोदींचा फोटो दिसू नये म्हणून सरकारला एक प्रणाली अवलंबण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, अन्य राज्यांमध्ये पंतप्रधानांचे फोटो प्रमाणपत्रावर ठेवू शकतात असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

आदर्श मतदान संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला होता. त्याबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वितरित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले लसीकरण प्रमाणपत्र जाहीर केले होते.