प्रियंका चोपडाला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा, पाकिस्तानच्या ‘या’ मंत्र्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री प्रियंका चोपडाला संयुक्त राष्ट्राच्या सदिच्छा दूत पदावरून हटवा अशी मागणी पाकिस्तानी मंत्र्याने केली आहे. याबाबत पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून प्रियंकाला सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची विनंती केली आहे. प्रियंकाने काश्मीर प्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेचे आणि पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे जाहीर समर्थन केले होते.

‘युनिसेफची दूत या नात्याने प्रियंका चोपडाने शांततेचा पुरस्कार करायला हवा. परंतु तिची भूमिका मात्र या तत्त्वांच्या विरोधात आहे. म्हणून तिला पदावरून हटवण्यात यावे’ अशी मागणी शिरीन मझारी यांनी पत्राद्वारे केली आहे. जेव्हा काश्मीरमधून कलम 370 हटवले तेव्हा आयशा मलिक या पाकिस्तानी महिलेने एका कार्यक्रमात प्रियंकाला ढोंगी म्हटले होते. इतकेचन नाही तर एअर स्ट्राईकनंतर प्रियंकाच्या जय हिंद या ट्विटवरही आयशाने तिला ढोंगी म्हटले होते.

आयशाला उत्तर देताना प्रियंका चोपडा म्हणाली होती की, “माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत. मलाही युद्ध व्हावं असं वाटत नाही. परंतु मी देशभक्तही आहे. माझ्या ट्विटमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याची माफी मागते.”

प्रियंका असेही म्हणाली की, “माझ्या मते सर्वांसाठी एक मध्यम मार्ग असतो. तुझ्यासाठीही असेल. परंतु ज्या पद्धतीने तू माझ्यावर ओरडून बोलत आहे ते योग्य नाही. आपण इते प्रेमाच्या भावनेनं एकत्र आलो आहोत.”