नावातून ‘शिव’ शब्द काढून ‘ठाकरे’सेना करा, उदयनराजे कडाडले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुमच्या नावातून ‘शिव’ हा शब्द काढा आणि ‘ठाकरे’सेना करा मग बघा महाराष्ट्रातील किती लोक तुमच्यासोबत येतात, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. लेखक जयभगवान गोयल यांच्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदयनराजेंनी सर्वांचाच समाचार घेतला.

उदयनराजे भोसले म्हणाले, “लेखक जयभगवान गोयल यांच्या आज ‘के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकाला माझा निषेध आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर वाईट वाटलं. त्यांनी पुस्तक मागे घेतलं आहे. मला अनेकांचे फोन आले. मला सविस्तर बोलायचं होतं. म्हणून मी आज सर्वांसमोर आलो.

पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले, “तुम्ही शिवरायांच्या नावाचा वापर का करता ? नाव वापरणाऱ्या प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे. त्यांचं नाव घ्यायचं असेल तर तसं वागा. आजपर्यंत महाराजांच्या नावाचा केवळ वापर केला गेला. तुम्ही तुमच्या पक्षाच्या नावातून ‘शिव’ शब्द काढून टाका. पक्षाच्या नाव ‘ठाकरे’सेना करा. मला पण बघायचं आहे की की नावातून ‘शिव’ शब्द जर काढला तर किती तरूण सोबत राहतात. तुमचंच सरकार आहे. तुम्ही हवं ते करू शकता. शिव नाव काढून टाका. शिवसेनेच्या स्थापनेच्यावेळी महाराजांच्या वंशजाकडे आला होतात का?” असा सवालही त्यांनी केला.

महाविकासआघाडीवर जोरदार हल्ला करताना उदयनराजे म्हणाले, “स्वार्थासाठी एकत्र आलेले लोक फार काळ एकत्र रहात नाहीत. राज्याचा खेळखंडोबा केला आहे. हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं. गलिच्छ राजकारणाचं खापर आमच्यावर फोडू नका. फक्त आम्हीच शिवाजी महाराजांचे वारस नाहीत. आपण सगळेच महाराजांचे वारस आहोत.” असंही ते म्हणाले.

You might also like