Pimpri News : कामावरून कमी केल्याच्या रागातून आयुध निर्माण फॅक्ट्रीसमोर कर्मचाऱ्यांचा राडा, अधिकाऱ्याच्या वाहनाची तोडफोड

देहूरोड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कामावरून कमी केल्याच्या रागातून देहूतील आयुध निर्माण फॅक्ट्रीच्या गेटसमोर माजी कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. तसेच कंपनीतील अधिकाऱ्यांच्या वाहनाचे नुकसान केले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.8) रात्री सातच्या सुमारास घडली.

बाजीराव टाळके, नितीन सुपारे, विक्रांत भोसले, गणेश हुंबे, तानाजी नरसळ, अशोक कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाळासाहेब सखाराम भांडवलकर (वय-47 रा. विश्वास रेसीडेन्सी, नवले ब्रीज जवळ, वडगाव बु., पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निगडी ते देहूकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयुध निर्माण गेटसमोर फिर्यादींच्या वाहनाला मोटार सायकल आडवी लावली. त्यांना पुढे जाण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर गाडीला घेराव घालून गाडीवर दगडफेक केली. वाहनचालका शेजारील दरवाजाचा हँडल, आरसा तोडला. तसेच फिर्यादींना गाडीतच मारण्याची धमकी दिली. कामगारांना आर्थिक मोबदला देवून कामावरून कमी केले होते. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांचा पाठलाग करुन कारचे नुकसान केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.