आता आणखी एका शहराचं नाव बदलण्याच्या तयारीत योगी सरकार, ‘बस्ती’ चं करणार ‘वशिष्ठनगर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने आता बस्ती जिल्ह्याचे नाव बदलण्याची तयारी केली आहे. या वस्तीचे नाव वशिष्ठनगर असे करण्यात आले आहे. बस्ती जिल्हा अयोध्या जिल्ह्याजवळ असून असे मानले जाते की वस्ती जिल्ह्याचे नाव हे गुरु वशिष्ठाच्या नावावर अस्तित्त्वात आले आहे. डीएम बस्ती यांनी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच नाव बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले आहे. त्याचवेळी फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले. तसेच मुगलसराय चे नाव बदलून पंडित दीन दयाल उपाध्याय नगर केले गेले आहे.

प्रयागराजमध्ये सध्या सुरू असलेल्या माघ यात्रेत संतांनी इच्छा व्यक्त केली आहे की उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मुस्लिम नावाने असणाऱ्या सर्व शहरांची नावे बदलली पाहिजेत. बस्ती जिल्ह्याचे नाव बदलून वशिष्ठ नगर केल्याच्या प्रस्तावाचे स्वागत करीत संत म्हणाले आहेत की राज्यातील मोठ्या संख्येने शहरांचे नामांतर मुगल शासकांनी केले होते आणि या शहरांना त्यांची मूळ नावे परत देण्यात यावीत असे त्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय दंडी स्वामी परिषदेचे स्वामी महेशाश्रम महाराज म्हणाले की, ‘प्रयागराजचे नाव बदलून अलाहाबाद करण्यात आले आणि योगी आदित्यनाथ यांनी परत प्रयागराज केले. याप्रमाणेच इतर शहरांना देखील त्यांचे मूळ हिंदू नावे परत द्यावीत, आमच्याकडे एक अशी सरकार आहे, जी हिंदू विचारांनी चालते आणि हिंदूंची आहे.’ दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजले की संतांची इच्छा आहे की आझमगड, अलिगड, मुझफ्फरनगर, शाहजहांपूर, फतेहपूर, बुलंदशहर आणि आग्रा या शहरांची नावे बदलली पाहिजेत.