प्रसिध्द बिल्डर DSK ची 4 अलिशान वाहने लिलावातून वगळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर डीएसकींची चार महागडे वाहने लिलावातून तूर्तास वगळण्यात आली आहेत. न्यायालयाने ही वाहने वगळावी, असा आदेश दिला असून, शनिवारी वाहनांचा लिलाव होणार होता. 2 बीएमडब्ल्यू, 1 पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात डीएसके आणि त्यांची पत्नी सध्या कारागृहात आहेत. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, त्यांची वाहने तसेच मालमत्ता पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याविक्रीकरून त्यातील रक्कम गुंतवणूकदारांना देण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे.

त्यानुसार, जप्त करण्यात आलेल्या काही वाहनांचा लिलाव येत्या शनिवारी होणार होता. मात्र, यातील 4 वाहने लिलावातून वगळावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या वाहनांच्या नोंदणीबाबत आरटीओ चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असेही आदेशात न्यायालयाने म्हटले आहे. लिलाव करण्यात येत असलेली 13 पैकी 8 वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे ती विकण्यात येऊ नये असा, अर्ज बचाव पक्षाकडून विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने 4 वाहने लिलावातून वगळली आहेत.

लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीची आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील आठ वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी न्यायालयात केला होता.

डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 20 वाहनांपैकी 13 वाहनांचा लिलाव करण्याची करण्याची परवानगी यापूर्वी न्यायालयाने दिली आहे. या वाहनांची किंमत 2 कोटी 57 लाख 50 हजार रुपये आहे. परंतु, वगळण्यात आलेली अलिशान वाहने ही कोट्यावधी रुपयांची आहेत.