‘या’ कारणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची बलात्काराची तक्रार मागे, रेणू शर्माने सांगितले

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde)  यांच्याविरोधात रेणु शर्मा यांनी केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने ही केस बंद केली आहे. रेणु शर्मा यांनी १५ दिवसांपूर्वी सोशल मिडियावर आपल्यावर धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तक्रार न घेतल्याने त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्तांना तक्रार पाठविली होती.  ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली. सहायक पोलीस आयुक्तांकडे तिचा जबाब नोंदविण्यात आला.

धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर रेणु शर्मा हिच्या बहिणीशी आपले संबंध असल्याचे व तिच्यापासून झालेल्या दोन मुलांना आपले नाव दिल्याचेही त्यांनी कबुली दिली. त्यातून राज्यभरात एकच चर्चेचा विषय झाला. भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करुन राज्यभर आंदोलन केले.

मात्र, त्याचवेळी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ भाजप व मनसेचे नेते पुढे आले.  रेणु शर्मा हिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक पाऊल मागे घेऊन मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला. हा सर्व हनी ट्रॅप असल्याचा बचाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाऊ लागला. अशी सर्व परिस्थिती विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यावर आता रेणु शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे.