‘हॉटेल सुरू करताय ! लोकांनी काय आकाशात उडत कामावर यायचं का ?’ : मनसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार झाली आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. रेल्वे सेवा बंद असताना हॉटेल सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर आता मनसेनं सरकारला टोला लगावला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “अनलॉक 5 सुरू होणार आहे. या अंतर्गत उपहारगृहे सुरू होणार आहेत. परंतु तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय ? त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का ?” असा सवाल देशापांडे यांनी केला आहे.

राज्य लॉकडाऊनमधून बाहेर पडत असताना मेट्रो आणि रेल्वे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. मुंबईसारख्या शहराला याचा मोठा फटका बसत आहे. कंपन्या आणि कार्यालयं सुरू असूनही लोकांना कामावर जाणं जिकीरीचं झालं आहे. बेस्ट बस सुरू असली तरी तिला मर्यादा आहे. लोकलअभावी बसमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यातून कोरनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. लोकल बंद ठेवण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. त्यामुळं राज्य सरकारनं लोकल सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मनसेची मागणी आहे. त्यासाठी मनसेनं अलीकडेच सविनय कायदेभंग आंदोलनही केलं होतं. पंरतु सरकारनं त्याला दाद दिली नही. त्यामुळं आता रेस्टरॉरंट सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले मुख्मंत्री उद्धव ठाकरे ?

राज्य शासनानं रेस्टॉरंट सुरू करण्याच्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वं तयार करून ती संबंधितांना पाठवलेली आहेत. ती फायनल झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या प्रतिनिधींसोबत काल (सोमवार दि 28 सप्टेंबर) मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे संकट खूप मोठ्या प्रमाणात आहे व या संकटकाळात महाराष्ट्रातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायिकांनी नियमांचे पालन केले आहे. व हे व्यावसायिक शासनाबरोर आहेत याचा मला आनंद आहे.”

पुढे बोलताना सीएम ठाकरे म्हणाले, “आजही कोरोनावर कुठल्याही प्रकारची लस निघालेली नाही. परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे इथून पुढे आपल्याला खूप काळजीपूर्वक जगावे लागणार आहे. आत्तापर्यंत अनेक व्यवसाय बंद होते आता आपण हळूहळू सुरू करत आहोत. व्यवसाय बंद ठेवणे ही निश्चितच चांगली बाब नाही किंवा आवडीचा विषय नाही. व्यवसायातून सरकारला कर स्वरूपात मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आणि हे व्यवसाय जर बंद असतील तर राज्यशासनाचा येणारा महसूल देखील थांबतो. अशा गोष्टीची सरकारला जाणीव आहे. म्हणून सर्व जबाबदारीचे भान ठेवून व मर्यादा पाळून व्यवसाय चालू करण्याचा आपला प्रयत्न आहे.” असंही त्यांनी सांगितलं.