पूर्व हवेलीतील अंतर्गत रस्त्याची झाली दुरुस्ती, स्थानिक नागरिक समाधानी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व हवेलीतील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची मुसळधार पावसाने दुरावस्था झालेली होती तसेच कोरोना महामारीच्या अनुषंगाने लाॅकडाऊन असल्याने काम करण्यात अडचणी येत होत्या परंतु अलिकडे सार्वजनीक बांधकाम खात्याच्या दक्षिण विभागाने कामासाठी कंबर कसली असून कोरेगाव मूळ पेठ थेऊर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून हा रस्ता चकाचक झाला आहे त्यामुळे नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.

पावसाने हवेली तालुक्यातील रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली होती यावर नागरिकांनी याची ताबडतोब दुरुस्तीची मागणी केली असता स्थानिक आमदार अशोक पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण चे कार्यकारी अभियंता अजय भोसले, उपअभियंता सारंग इनामदार तसेच प्रशांत पवार यांच्याशी संपर्क केला व रस्त्याच्या अडचणी संदर्भात माहिती घेतली आणि काम मार्गी लावण्याची सूचना दिली. त्यानंतर सार्वजनीक बांधकाम खात्याच्या दक्षिण विभागाने कामासाठी प्राथमिकता देऊन या रस्त्याचे काम हाती घेतले.या रस्त्यावर कोरेगाव मूळ पासून पेठ पर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली होती परंतु हा संपूर्ण रस्ता सध्या चकाचक झाला असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच प्रशांत पवार यांनी सांगितले की थेऊर नायगाव कोरेगाव मूळ रस्त्याचे काम पुढील आठवड्यात चालू होत असून तो सुध्दा लवकरच नागरिकांना वाहतुकीला विना अडथळा तयार होईल.