‘गंगा दशहरा’ निमित्त प्रयागराज संगमावर भाविकांची तोबा गर्दी

प्रयागराज : वृत्तसंस्था – लॉकडाऊन ५ मध्ये धार्मिक स्थळे ८ जूनपासून खुली केली जाणार आहे. धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी नसतानाही प्रयागराज येथील संगमघाटावर भाविकांची सोमवारी तोबा गर्दी पहायला मिळाली. दुसरीकडे वाराणसीतील गंगा घाट मात्र भाविकांना परवानगी नसल्याने बंद केल्याने तो ओसाड पडल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने ३१ जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमध्ये कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रामध्ये हळू हळू सर्व बाबींना परवानगी देण्यात येणार आहे. येत्या ८ जूनपासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. उत्तर भारतात गंगा दशहरा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भाविक संगमावर येऊन गंगा नदीत स्रान करतात.

प्रयागराज संगमघाटावर आज सकाळी शेकडो भाविक जमले असून ते नदीत स्रान करीत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नसल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी पोलीसही दिसून आले नाही. या भाविकांना मंदिरांच्या परिसरात कसे जाऊन देण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.