प्रज्ञा सिंह यांना मनापासून माफ करणार नाही : नरेंद्र मोदी, पक्षानेही झटकली जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवर मोदींनी खुलासा केला आहे. ते एका मुलाखतीत म्हणाले की, गांधीजी आणि गोडसे यांच्या बाबत केली गेली वादग्रस्त वक्तव्य खूप वाईट आणि टीकेस पात्र आहेत, आजच्या समाजात हा विचार चालू शकत नाही. अशी वक्तव्ये करणाऱ्या लोकांनी शंभर वेळा विचार केला पाहिजे. त्यांनी माफी मागितली आहे, परंतु मी मनापासून त्यांना माफ करू शकत नाही.

मध्यप्रदेशमधील भाजप प्रवक्ते अनिल सौमित्र यांना सोशल मीडियावर गांधीविरोधी पोस्ट लिहिल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. सौमित्र यांनी गांधीजी यांना पाकिस्तानचा राष्ट्रपिता असे संबोधले होते. नथुराम गोडसे हा देशभक्त होता असे विधान प्रज्ञासिंह यांनी केले होते.

या वादग्रस्त वक्तव्यांवर भारतीय जनता पार्टी गांभीर्याने विचार करत असल्याचे अमित शहा यांनी म्हंटले आहे. ते म्हणाले कि या दोन दिवसात अनंत कुमार हेगड़े, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर आणि नलिन कटील यांनी जी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, ती त्यांची वैयक्तिक मते आहे. या वादग्रस्त वक्तव्यांशी पक्षाचा काहीही संबंध नाही. या लोकांनी त्यांची वक्तव्ये मागे घेतली असून माफीही मागितली आहे. या तिन्ही वादग्रस्त वक्तव्यांना अनुशासन समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने तिन्ही नेत्यांना दहा दिवसात स्पष्टीकरण द्यायला सांगितले आहे.