भारत टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकणार?, ICC ने दुसरा पर्याय शोधला

दुबई : वृत्तसंस्था – भारतामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर दररोज अडीच हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनही मिळत नसल्याचे चित्र आहे. भारतातल्या कोरोना संकटात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर शंकेचे ढग तयार झाले आहेत. तसेच आयपीएलचे आयोजन सुरु ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे आता टी-20 च्या आयोजनावर देखील असेच प्रश्न निर्माण होत आहेत.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी युएईला स्टँडबाय ठेवले आहे. जर कोरोनामुळे भारतात वर्ल्डकप आयोजनात अडचणी आल्या तर ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाईल. अर्थात टी-20 वर्ल्डकपसाठी अद्याप सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

2021 चा टी-20 वर्ल्डकप नियोजनानुसार 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार होता. कोरोना व्हायरसमुळे तो भारतात 2021 मध्ये आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. युएईमध्ये भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे तिथे स्पर्धेचे आयोजन करणे शक्य आहे. युएई क्रिकेट बोर्डाचे आणि बीसीसीआयचे संबंध चांगले आहेत. मागील वर्षी आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते.