शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी शासन बांधिल : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्‍या हस्‍ते मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. पवार यांनी विविध पथकांची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. यावेळी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त व विशेष सुरक्षा पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ajit pawar

यावेळी राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, पुणे पोलीस आयुक्त कार्यालय पथक, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला पोलीस दल, रेल्वे पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांनी संचलन केले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, वन विभाग, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग यांनी माहितीपर चित्ररथ सादर केले. यावेळी पोलीस वाद्यवृंद, वाहतूक पोलीस मोटर सायकल रायडर पथक, श्वान जॅक गुन्हे शोधक यांनी सलामी दिली.

देशाच्या जडणघडणीत सर्व देशवासीयांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आपण सदैव स्मरणात ठेवायला हवा, असे सांगून कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्म पुरस्कार, पद्मविभुषण, पद्मभुषण, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच पेालिस व अग्निशमन सेवा पदक प्राप्त अधिकारी व कर्मचा-यांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. आजपासून ‘प्लास्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान’ सुरु करण्यात येत असून हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. सर्वांच्या सहकार्यातून ही लोकचळवळ यशस्वी करावी, असे आवाहन करुन श्री. पवार म्हणाले, कृषी आयटीआय सारखी नवीन संकल्पना राबविण्यात येणार असून त्यापैकी एक महत्त्वाची संस्था पुणे जिल्ह्यात तयार होणार असून राज्यातील तरुणांचा कौशल्य विकास साधण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. मुंबईसह कोकण किनारपट्टी, पुणे तसेच राज्यातल्या अनेक भागातल्या हेरिटेज वास्तू व पर्यटन स्थळांचे हेरिटेज सौंदर्य वाढवून या ठिकाणी पर्यटन विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

पुण्यात मेट्रोची कामे गतीने होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत निश्चितच सुधारणा होईल. सहकार, कृषी, उद्योग विभागाला चालना देण्याबरोबरच तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यावर राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे व सतर्कतेमुळे गुन्ह्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाचा ‘भरोसा सेल’ महत्त्वपूर्ण काम करत आहे. तसेच आयटी उद्योगात काम करणाऱ्या महिलांसाठी ‘बडीकॉप’ तर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलीस काका’ अशा योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. पोलिसांच्या उल्लेखनीय कार्यामुळेच यावर्षी पुणे पोलिसांना राष्ट्रीय पातळीवरील पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, हे गौरवास्पद आहे.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा –