PM मोदींनी ‘प्रजासत्ताक’ दिनी मोडली 48 वर्षांची ‘ही’ परंपरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पहायला मिळत आहे. दरम्यान, आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक परंपरा मोडीत काढली आहे. इंडिया गेट येथील अमर ज्योती जवान येथे प्रथम न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 48 वर्षाची परंपरा मोडीत काढली. त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या स्मारकाचे मागील वर्षी 25 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. यावेळी देशातील पहिल्या सीडीएसव्यतिरिक्त तिन्ही सैन्याच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.

1971 मधील भारत-पाक युद्धाच्या शहीदांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे 1972 मध्ये तयार करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी अमर जवान ज्योती येथे महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रमुख नेत्यांसह तिन्ही दलाचे सैन्य प्रमुख आदरांजली वाहण्यासाठी जात असतात. यावेळी प्रथमच प्रजासत्ताक दिन समारंभात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) सहभागी झाले. माजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी 1 जानेवारीला सीडीएसचा पदभार स्वीकारला. लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे, हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया आणि नेव्ही चिफ अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांनी मागील वर्षी लष्करातील सर्वोच्च पदे भूषवली आहेत.

इंडिया गेटपासून जवळच 44 एकरांवर पसरलेले राष्ट्रीय युद्ध स्मारक आहे. अमर चक्र, शौर्य चक्र, संन्यास चक्र आणि रक्षक चक्र अशा चार स्तंभांनी हे बनलेले आहे. यावर 25 हजार 942 जवानांची नावे ग्रॅनाईट टॅब्लेटवर सोन्याच्या अक्षरांनी लिहलेली आहेत. पंतप्रधानांनी मागील वर्षी देशाचे 44 एकर युद्ध स्मारक देशाला समर्पित केले होते.

फेसबुक पेज लाईक करा –