लाल किल्ला हिंसा : दिल्ली पोलिसांकडून धरपकडीचा वेग वाढणार, जारी केली आणखी 20 छायाचित्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर गोंधळ घातल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या अ‍ॅक्शनला वेग आला आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपींची छायाचित्रे जारी केली आहेत. दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसेत कथित प्रकारे सहभागी आणखी 20 लोकांची छायाचित्रे जारी केली आहेत. आता त्यांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेने सुद्धा वेग घेतला आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांव्या क्राईम ब्रँचने 26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसेप्रकरणी 12 लोकांची छायाचित्रे जारी केली होती.

या सर्वांवर लाल किल्ल्यात झालेल्या उपद्रवादरम्यान पोलिसांवर हल्ला करण्याचा आरोप आहे. यापूर्वी, दिल्ली पोलीस कमिश्नर एस. एन. श्रीवास्तव यांनी 26 जानेवारीला झालेल्या हिंसेसंबंधीचे एक हजार व्हिडिओ मिळाल्याचे वक्तव्य केले होते. पोलीस सतत आरोपींची धरपकड करत आहेत.

एसआयटी करत आहे तपास
26 जानेवारीच्या हिंसेतील या चेहर्‍यांचा शोध दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँच एसआयटी तपास करत आहे. या 12 उपद्रवी लोकांच्या हातात काठ्या आहेत, ज्यांनी लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी हिंसा केली. पोलिसांवर हल्ला सुद्धा केला. दिल्ली पोलिसांनी दंगलखोरांची ओळख पटवण्यास सुरूवात केली आहे. प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने फॉरेन्सिक टीमच्या मदतीने हिंसा करणार्‍यांचे फोटो स्पष्ट करण्यास सुरूवात केली आहे.

लक्खा सिंह सिधानाने जारी केला व्हिडिओ
या हिंसेप्रकरणी दिल्ली पोलीस पंजाबचा गँगस्टर लक्खा सिंह सिधानाचा शोध घेत आहेत. दरम्यान, फरार असलेल्या लक्खा सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. यात लक्खा सिंहने शेतकर्‍यांना समर्थन दिले आहे, तर दुसरीकडे पोलिसांना खुलेआम इशारा देत 23 फेब्रुवारीला आणखी एक आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. हे आंदोलन भठिंडामध्ये करणार असल्याचे म्हटले आहे. त्याने पंजाबच्या तरूणांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.