‘रिपब्लिक’चे मालक, चालकही अडकले TRP घोटाळ्यात, TV पाहण्यासाठी पुरवले पैसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीआरपी घोटाळ्यात अडकलेल्या रिपब्लिक(republic) न्यूज चॅनलच्या मालक-चालकांभोवतीचा फास लवकरच आवळला जाणार आहे. कारण या प्रकरणी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलेला दहावा आरोपी अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक याने चौकशीत रिपब्लिक (republic owner) टीव्ही पाहण्यासाठी वाहिनीचा मालक, चालक संबंधितांनी पैसे पुरविल्याचे सांगितले आहे. आता या मालक, चालकांचा पाहिजे असलेले आरोपी म्हणून शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, अभिषेक कोलवडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी महामुव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक चॅनेल्स जास्त वेळ पाहण्यासाठी संबंधितांच्या मालक, चालक तसेच त्यांच्या संबंधित अधिकार्‍यांकडून पैसे स्वीकारून ते बॅरोमीटर असलेल्या घरातील लोकांना दिले आहेत.

पोलिसांनी सोमवारी अभिषेक कोलवडे, रामजी दूधनाथ वर्मा (41), दिनेशकुमार विश्वकर्मा (37) आणि हरीश पाटील यांना न्यायालयात हजर केले होते. अभिषेकसह वर्मा, विश्वकर्मा, पाटील या आरोपींना 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात पुढे आलेली माहिती गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयात दिली.

पोलिस सध्या महामुव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक चॅनेल्सच्या मालक, चालकासह अन्य पदाधिकार्‍यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराबाबतचे पुरावेही पोलिसांना सापडले आहेत. या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टीआरपी घोटाळ्यात अटकेत असलेला आरोपी हरीश याचे अभिषेकच्या मॅक्स मीडिया कंपनीच्या बँक खात्यात संशयास्पद देवाणघेवाण झाल्याचे आणि दोघांमध्ये घनिष्ट संबंध असल्याचे उघड झाले आहे. याबाबतही अधिक तपास सुरू आहे. अटक आरोपी आणि पाहिजे आरोपी खोटे साक्षीदार तयार करून यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही या वेळी न्यायालयात सांगण्यात आले.

रिपब्लिक चॅनेल्स पाहण्यासाठी पैसे पुरविणारा हंसाचा माजी कर्मचारी उमेश मिश्रा याला सोमवारी जामीन मंजूर झाला. ही मोठी अटक होती. दरम्यान, रिपब्लिकच्या संबंधित पदाधिकार्‍यांनी चॅनेलची लोकप्रियता वाढल्याचे भासवण्यासाठी अनेक गैरप्रकार केल्याच्या तक्रारीही गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.