रिपब्लिकन सेनेचा संघर्ष एल्गार सप्ताह निमित्ताने सामाजिक दृष्ट्या विविध प्रश्नांवर ‘पाथरी’मध्ये जन आक्रोश आंदोलन

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक दृष्ट्या विविध प्रश्‍नांवर रिपब्लिकन सेनेकडून संघर्ष एल्गार सप्ताह निमित्ताने जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवार 9 ऑक्टोबर रोजी पाथरी येथे रिपब्लिकन सेनेकडून आंदोलन करण्यात आले.

रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक विषयांवर तहसील प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसील प्रांगणात जन आक्रोश आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले तहसीलदार सुभाष कट्टे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी हाथरसमधील घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. तसेच सामाजिक दृष्ट्या विविध प्रश्नांवर घोषणाबाजी केली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन देण्यात यावी.

शहरी आणि ग्रामीण भागातील स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा. शहरी व ग्रामीण भागातील गायरान जमीन धारकांच्या नावे वर्ग करण्यात यावी. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिलेले ( पीएमईजीपी ) तसेच बचत गट कर्ज माफ करण्यात यावे. पगार तसेच व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. सर्व प्रकारच्या रेशनकार्ड उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
जिंतूर तालुक्यातील अकोली येथील पार पडलेल्या ग्रामसभेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. वरील मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.