गाव तिथे रिपब्लिकन : रामदास आठवले

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील विविध भागात रिपब्लिकन पक्षाचे काम चांगले असून आता गाव तिथे रिपब्लिकन शाखा या उपक्रमाद्वारे पक्ष संघटन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. रविवारी (दि २७) पुण्यात रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाची शाखा प्रत्येक गावात आहे. आज अखेर आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आता भाजप बरोबर राहिलो आहे. इतर पक्षांना रिपब्लीकन पक्षाचा नेहमी फायदा झाला आहे. मात्र इतर पक्षांचा रिपब्लीकन पक्षाला काही फायदा झाला नसून आमचा एक आमदार निवडून येत नाही. अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, काही लोक अपक्ष उभे राहून देखील जिंकून येतात. पण रिपब्लिकन च्या उमेदवारांना यश मिळवता येत नाही. कार्यकर्त्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.