लेहतील चादर ट्रेकमध्ये अडकलेल्या 41 ट्रेकरांना वाचविण्यात यश

लेह : वृत्त संस्था – लेहमधील जांस्कर नदीवरील बर्फाच्या वरुन पाणी वाहू लागल्याने चादर ट्रेकमध्ये ४१ ट्रेकर अडकवून पडले होते. त्यांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. हवामानात मोठा बदल झाल्याने व नदीतील बर्फ वितळू लागल्याने पुढील दोन दिवस हा ट्रेक स्थगित करण्यात आला आहे.
लेह जिल्ह्याचे मजिस्ट्रेट सचिन कुमार वैश्य यांनी सांगितले की, बर्फाच्यावरुन पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने ट्रेकर टिब आणि नेयार्क शिबीरांच्यामध्ये अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या राहण्याची आवश्यक ती व्यवस्था केली आहे.

लडाख क्षेत्रातील जांस्कर घाटीत थंडीच्या काळातील ही एक सर्वात कठीण व साहसी ट्रेक मानला जातो. यासाठी देशापरदेशातून हौशी पर्यटक लेहला येत असतात. सिंधु नदीची उपनदी असलेल्या जांस्कर नदीतील पाणी गोठून जाते. या पाण्यावरील बर्फातून स्थानिक रहिवासी येजा करतात. त्यातूनच पर्यटकांसाठी हा एक ट्रेक तयार करण्यात आला आहे.

चादर याचा स्थानिक भाषेतील अर्थ बर्फाची चादर असा आहे. उन्हाळ्यात या नदीतून राफ्टिंग केले जाते. तर थंडीत त्यातील बर्फावरील खेळ खेळले जातात. नदीतील बर्फावरुन चालत जाणारा हा १०५ किमीचा ट्रेक असतो. त्यात पर्यटक दररोज १५ ते १७ किमी चालत जातात. हा ट्रेक सुरु असताना हवामानातील बदलामुळे नदीतील बर्फ वितळल्याने त्यात ट्रेक करणारे ४१ ट्रेकर नदीच्या मध्येच अडकून पडले होते. त्यांना सुखरुप वाचविण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/