शिक्षक संचालनायातील संशोधन सहायक ५० हाजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिक्षण संस्थेची आरटीई मान्यता रद्द न करण्यासाठी प्राथमिक शिक्षक संचालनालयातील संशोधन सहायकास ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. निजाम हाजी नन्हुमिया शेख (वय -36) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायकाचे नाव आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) करण्यात आली.

या प्रकरणी सौ पार्वती बाई अपंग शिक्षण व प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्षांनी पुणे लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार हे सौ पार्वती बाई अपंग शिक्षण व प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेने संस्थेतील शिक्षक योगेश महाजन यांच्यावर कारवाई केली आहे. योगेश महाजन यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडे संस्थेची RTE (Right To Education ) मान्यता रद्द करण्यासाठी तक्रार अर्ज केला होता. शिक्षण संचालनालयातील संशोधन सहायक निजाम शेख यांनी या अर्जावर कारवाई सुरू केली होती. महाजन यांच्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी व RTE मान्यतेसाठी संस्थेस अनुकूल शेरे देण्यासाठी शेख यांनी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पथकाने मंगळवारी (दि.२९) पंचासमक्ष पडताळणी केली असता शेख यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज पथकाने सापळा रचून शेख याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.