‘कोरोना’च्या रूग्णांसाठी दिलासादायक ! रिकव्हरीनंतर बरे होऊ लागतात फुफ्फुसं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस दिवसेंदिवस भयावह रूप धारण करत आहे. कोरोनाची प्रकरणे भारतासह इतर देशांमध्ये झपाट्याने वाढत आहेत. मोठ्या संख्येने लोकांचे मृत्यू होत आहेत. मात्र मोठी संख्या त्या लोकांचीही आहे, जे कोरोनावर मात करत आहेत आणि रुग्णालयातून बरे होऊन घरी जात आहेत. यापूर्वी असा दावा केला जात होता की, कोरोना संसर्गामुळे लोकांची फुफ्फुसे खराब होतात. आजारातून बरे झाल्यानंतरही फुफ्फुस व्यवस्थित काम करत नाहीत. आता एका नव्या संशोधनात कोरोनामधून बरे झालेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या लोकांची फुफ्फुसं आजारानंतर हळूहळू बरी होऊ लागतात. हे संशोधन एप्रिल ते जून या काळात ऑस्ट्रियामधील संशोधकांनी केले आहे. यात त्यांनी कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर ८२ जणांचा समावेश केला आहे. यातून बरे झाल्याच्या ६ आठवडे, १२ आठवडे आणि २४ आठवड्यांनंतर फुफ्फुसांवर होणारा परिणाम पाहिला गेला.

संशोधनात कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीबाबत काय आढळले?
संशोधनानुसार, कोरोना विषाणूमधून बरे होऊन रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या लोकांच्या फुफ्फुसांचे सिटी स्कॅन केले गेले. काही लोकांच्या फुफुसांचे सिटी स्कॅन ६ आठवड्यांनंतर आणि काहींचे १२ आठवड्यांनंतर केले गेले. त्यात असे आढळले की, कोविड-१९ मुळे खराब झालेली फुफ्फुसं पुन्हा बरी होऊ लागली. या लोकांच्या फुफ्फुसांच्या स्थितीत बरीच सुधारणा झाली.

कोविड-१९ मधून बरे होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसात झाली सुधारणा
संशोधनात असे आढळले की, कोविड-१९ मधून बरे होऊन रुग्णालयातून घरी परतल्याच्या ६ आठवड्यांनंतर ८८ टक्के लोकांच्या फुफ्फुसांत नुकसान आढळले. यानंतर १२ आठवड्यांत लोकांची ही संख्या ५६ टक्क्यांवर आली. म्हणजेच फुफ्फुसांच्या स्थितीत सुधारणा झाली आहे.