Maratha Reservation : दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, शरद पवारांचा टोला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाला आरक्षण (Reservation) मिळवून देण्यासाठी सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी आज दिला.

पंढपुरातील माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, रामदास महाराज जाधव (कैकाडी), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. त्याच अनुषंगाने शरद पवार त्यांच्या कुटूंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पंढरपुरात आले होते. भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे दोन्ही खासदार भाजप पुरस्कृत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारसीनेच त्यांची राज्यसभेत निवड करण्यात आली. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राज्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी पवार यांनी मारली आहे.

खासदार रामदार आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही. खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलखात घेतली. तेव्हाच त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या भेटीस राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकेल, असं शरद पवार यांनी नमूद केलं.

केंद्र सरकारने नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध संस्था सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या. पण त्यांचा तपास दुसऱ्या दिशेने सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.

कृषी विधेयकाच्या विरुद्ध विविध राज्यांनी वेगवगेळी भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करुन शेतमालाला किंमत देण्याचे धोरण सरकारने सुरु ठेवावे. केंद्राने कांद्यावर घेतलेली निर्यातबंदी उठवण्याची गरज आहे. शेती विधेयकामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असून, विधेयकाबाबत सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रित येत काय निर्णय घेत येईल याचा सुद्धा विचार सुरु असल्याचं पवार यांनी शरद पवार यांनी स्पष्ट केलं.