आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही,मेडिकल कॉलेजमधील OBC कोट्याच्या याचिकेवर SC नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ओबीसी उमेदवारांच्या कोट्यावरील खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, आरक्षण मूलभूत अधिकार नाही. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यांच्या आदेशात म्हटले की, आरक्षणाच्या अधिकाराला कोणीही मूलभूत अधिकार म्हणू शकत नाही आणि म्हणूनच आरक्षणाचा लाभ न देणे हे कोणत्याही घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन मानले जाऊ शकत नाही. सीपीआय, द्रमुक आणि त्यांच्या काही नेत्यांकडून ५० टक्के ओबीसी आरक्षण, २०२०-२१ मध्ये युजी, पीजी वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या आरक्षणासाठी याचिका दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये ओबीसी, एससी आणि एसटीसाठी ६९ टक्के आरक्षण असून त्यात जवळपास ५० टक्के ओबीसी आरक्षण आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर काय म्हटले ?
तामिळनाडू कायद्यांतर्गत तरतूद असतानाही इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ५० टक्के आरक्षणाचा लाभ न देणे तर्कसंगत नाही, असे अण्णा द्रमुकने आपल्या याचिकेत म्हटले आहे. अण्णा द्रमुक पक्षाने आपल्या याचिकेत म्हटले की, ऑल इंडिया कोटा प्रणाली लागू केल्यापासून अनेक शैक्षणिक सत्रांमध्ये देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटा सीटवर इतर मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व कमी झाले आहे.

परंतु याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न केला की, कलम ३२ नुसार याचिका कशी स्वीकारली जाऊ शकते, कारण आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. खंडपीठाने म्हटले, ‘कोणाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे ? कलम ३२ फक्त मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनासाठी आहे. आम्हाला विश्वास आहे की, तुम्हाला सर्वांना तामिळनाडू नागरिकांच्या मूलभूत अधिकारांमध्ये रस आहे. पण आरक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही.’

कोर्टाने तमिळनाडूच्या विविध राजकीय पक्षांकडून एका विषयावर एकत्र येण्याचे कौतुक केले. पण या याचिकेवर विचार करू शकत नाही. जेव्हा याचिकाकर्त्यांनी हे सांगितले की, त्यांच्या याचिकेचा आधार तमिळनाडू सरकारच्या आरक्षणावरील कायद्याचे उल्लंघन आहे, तेव्हा खंडपीठाने सांगितले की याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात जावे. खंडपीठाने त्यांना याचिका मागे घेण्यास व कोणत्याही सवलतीसाठी उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली.