घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेचे गिफ्ट

मुंबई : वृत्तसंस्था

आपलं स्वत:चे आणि हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. तुम्हालाही आपलं हक्काचं घर खरेदी करायचे आहे? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने गृह कर्जाची सुविधा आणखीन सुलभ केली आहे. त्यामुळे आता ३५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज प्राथमिक क्षेत्रातील कर्जाच्या श्रेणीत समावेश केला आहे. ही सुविधा ४५ लाख रुपयांपर्यंतचे  घर खरेदी करणाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. बँकांकडून मिळणारे प्राथमिक क्षेत्रातील कर्ज हे इतर कर्जांच्या तुलनेत खूपच स्वस्त असते. यामुळे आता ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन ते सहा लाख रुपये आहे असे नागरिकही आपले घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.

रिझर्व्ह बँकेने काढलेल्या या सूचनेनुसार, आर्थिक रुपात कमकुवत आणि मध्यम उत्पन्न असलेल्या वर्गासाठी स्वस्त गृह कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्राथमिक क्षेत्रातील कर्जाच्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे प्राथमिक क्षेत्रातील कर्जात गृह कर्जाची पात्रता महानगरांत ३५ लाख रुपये आणि इतर शहरांसाठी २५ लाख रुपये केली आहे. यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे की, दहा लाख आणि त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अशा घराची किंमत ४५ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावी. तर, इतर शहरांत स्वस्त गृह कर्जाच्या योजनेच्या घरांचे दर ३० लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. असे असल्यास त्यांना प्राथमिक क्षेत्रातील कर्जाची सुविधा उपलब्ध होईल.