एकेकाळी मातोश्रीवरून सरकार बनत होतं, आज नेत्यांच्या मनधरणीसाठी उध्दव ठाकरेंना हॉटेलचे खेटे मारावे लागतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारे मातोश्री निवासस्थान आजकाल बदलत्या राजकीय समीकरणांमुळे दूर गेले आहे. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असत. मातोश्रीमध्ये त्यांना भेटायला मोठ मोठे नेते येत असत. पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी आणि नेत्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये हॉटेलच्या चकरा माराव्या लागत आहेत. ठाकरे कुटुंबातून मुख्यमंत्री बनविण्याच्या इच्छेने त्यांना आता मातोश्रीच्या बाहेर पाय ठेवावा लागला आहे. यातून शिवसेना आणि भाजपा यांचे अनेक दशकांपूर्वीचे संबंध आता जवळपास तुटल्यातच जमा आहे.

… तरीही सत्तास्थापनेपासून शिवसेना दूरच –

हॉटेल रंग शारदा आणि रिट्रीट मालाड येथे शिवसेनेचे आमदार ठेवले होते. उद्धव ठाकरे मध्यरात्री तेथे पोहोचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी ताजमहाल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तर हॉटेल ट्रायडंट वांद्रे येथे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचीही भेट घेतली. सत्तास्थापनेची जुळवाजुळव करण्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले पण या संपूर्ण काळात कोणीही मातोश्रीवर फिरकले नाही.

किंग मेकर ते किंग पर्यंतचा प्रवास

एकेकाळी ठाकरे कुटुंबीयांना किंग मेकर म्हटले जात असे. पण आता असे दिसून येत आहे की उद्धव ठाकरे यांनी किंग मेकरकडून किंग होण्याच्या मार्गावर सुरुवात केली आहे. त्यासाठी ते आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात जाऊन भाजपाशी राजकीय संबंध तोडण्यात गुंतले आहेत. परंतु राज्याच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असे बरेच जुने मतभेद आहेत की ते सोडविण्यासाठी बराच काळ लागेल. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील सरकार इतक्या सहज आणि लवकर स्थापन होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत राज्यात सत्तास्थापनेचा संभ्रम कायम आहे.

आता कॉंग्रेस- राष्ट्रवादीचीही मुख्यमंत्रीपदासाठी अट –

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात विवाद सुरू होता. राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला आमिष दाखविले. पाच वर्षे मुख्यमंत्री केवळ शिवसेनेचे असू शकतात. मात्र, यावर अद्याप शरद पवार यांनी कधीही अधिकृत निवेदन दिले नाही. आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांची अट शिवसेनेसमोर ठेवली आहे अशी चर्चा सुरु आहे. जरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांचे महाशिवआघाडीचे सरकार बनले, तरी अवघ्या अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्याची खुर्ची असणार आहे.

सत्ता स्थापनेचा तिढा सुरूच –

कॉंग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरहून महाराष्ट्रात परत बोलावले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या चिठ्ठीवर स्वाक्षरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांना कशावरुन राग आला आणि तेथून उठून निघून गेले. अशी माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत आणखी काही काळ सरकार स्थापनेचा तिढा सुरूच राहण्याचे चित्र आहे. यात सर्वाधिक जागा मिळून देखील सत्तास्थापना न करता आल्यामुळे भाजपही सरकार स्थापनेचा जोरदार प्रयत्न करीत आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like