मुंबईत अतिश्रमाविरोधात निवासी डॉक्टर आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील सर्वात मोठ्या कोरोना केंद्रामध्ये सुरू होणार्‍या 250 अतिदक्षता खाटा बाह्यस्रोताद्वारे न चालविता महापालिकाच चालविणार आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांना सलग 10 दिवसांच्या कामानंतर एकच दिवस रजा मिळणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मार्ड संघटनेकडून गुरुवारपासून सात दिवस निषेध नोंदविण्यात येणार आहे.

महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथे 200, मुलुंडला 20 आणि वरळीला ‘नॅशलन स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया’मध्ये (एनएससीआय) 30 अशा 250 अतिदक्षता खाटा चालविण्याकरिता परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांचे मनुष्यबळ अपुरे आहे. कंत्राटी पद्धतीने डॉक्टर नियुक्त करण्याकरिता जाहिराती काढूनही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर पालिकेने रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मदतीनेच हा विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आत्तापर्यंत 10 दिवस काम केल्यावर पाच दिवस विलगीकरण असे चक्रानुसार निवासी डॉक्टरांना काम दिले जात होते; परंतु आता अतिदक्षता खाटांसाठी मनुष्यबळ उभारण्यासाठी यांना 10 दिवसांच्या कामानंतर केवळ एकच दिवस रजा देण्याचे फर्मान पालिकेने काढले आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये नाराजी पसरली आहे.