‘कोव्हॅक्सीन’ टोचून घेण्यास निवासी डॉक्टरांनी दर्शविला नकार, म्हणाले – ‘कोव्हिशील्ड’च हवीय

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशात आजपासून शनिवार (दि. 16) कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पण दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयात लसीकरण मोहिम सुरु होण्याआधीच मोठी घडामोड समोर आली आहे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी ‘कोव्हॅक्सीन’ ऐवजी ‘कोव्हिशील्ड’ लस टोचली जावी अशी मागणी करणारे पत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना लिहल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला लिहिलेल्या पत्रानुसार, रुग्णालयात सध्या भारत बायोटेकने विकसीत केलेल्या कोव्हॅक्सीनची लस निवासी डॉक्टरांना दिली जात आहे. पण कोव्हॅक्सीनच्या चाचण्या पूर्ण न झाल्यामुळे डॉक्टरांना या लसीबाबत काही शंका आहेत. याशिवाय यामुळे लशीकरणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होणार नाही. त्यामुळे कोव्हॅक्सीन ऐवजी कोव्हिशील्ड लस डॉक्टरांना दिली जावी, असे डॉक्टरांनी पत्रात नमूद केले आहे.

पहिल्या टप्प्यात कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून पहिल्या फळीत राहून जीवाची बाजी लावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात आली. पण त्याआधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सीनचा उल्लेख ‘बॅकअप’ असा केला होता. पण गुलेरिया यांच्या या विधानावर भारत बायोटेकच्या संचालकांनी नाराजी व्यक्त केली होती.

एम्सच्या डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांनीही कोव्हॅक्सीनला नाकारल
कोव्हॅक्सीनच्या चाचणीमध्येही एम्सच्या कर्मचाऱ्यांनी उत्साह दाखवला नव्हता. कोव्हॅक्सीनच्या चाचणीवेळी एम्समध्ये स्वयंसेवकही खूप कमी होते. चाचणीत सहभागी होण्यासाठी मोबाइल मेसेज पाठविण्याची वेळ आली होती. पण आता तीच लस एम्समध्ये कर्मचाऱ्यांना टोचण्यासाठी पाठविण्यात आली आहे. दरम्यान, एम्समध्ये कोव्हॅक्सीनची चाचणी झालेली असून ती सर्व पातळ्यांवर सुरक्षित असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.