सुखद बातमी : निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या विद्या वेतनासह अन्य मागण्यासाठी संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मध्यरात्री मागे घेतला आहे. त्यामुळे पाऊस व रोगराई पसरण्याची शक्यता असलेल्या या काळात डॉक्टरांनी संप मागे घेतल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

मार्डचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी, अधिक्षक डॉ़ तात्याराव लहाने यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यानंतर मार्डने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांचे थकीत विद्या वेतन तातडीने देण्यात येणार आहे. तसेच येत्या कॅबिनेटमध्ये विद्या वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव आणण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम तातडीने जमा करण्यात येईल. त्यांच्या सुट्ट्यांबाबतची मागणीही मान्य करण्यात आली. येत्या कॅबिनेटमध्ये विद्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा संप करण्याचा इशारा मॉर्ड ने दिला आहे.

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयातील ओपीडी सेवा विस्कळीत झाली होती. सध्या सर्वत्र पाऊस सुरु असल्याने रुग्णांची संख्या वाढलेली आह. अशात डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत होते.