महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची मागणी

पणजी : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत आहे. देशाच्या तुलनेत लहान राज्यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेतली होती. गोवा राज्याने देखील तशी काळजी घेतली होती. काही दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य ग्रीन झोनमध्ये गेल्याचे जाहीर केलं होत. परंतु त्यानंतर परराज्यातून गोव्यात आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग असल्याचे आढळून आले. यानंतर गेल्या काही दिवसांत गोव्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे राज्याचे भाजप नेते आणि मंत्री मायकल लोबो यांनी महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गोवा याआधी ग्रीन झोनमध्ये होतं, संपूर्ण राज्याचा विचार केला तर आम्ही आजूनही ग्रीन झोनमध्येच आहोत. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या काही दिवसांत दोन-तीन लोकं दिल्लीवरून राज्यात आली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. सध्या राज्यात जे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यातील बहुतांश हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका अशी मागणी केली आहे, असे लोबो यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मायकल लोबो म्हणाले, महाराष्ट्रातील लोकांवर बंदी घाला याचा अर्थ असा नाही की मी तिकडच्या लोकांविरोधात आहे. परंतु सध्या सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुळे पुढील काही कालावधीसाठी ही बंदी घालण्यात यावी. रस्ते, रेल्वे किंवा हवाई मार्गाने कोणत्याच प्रकारे महाराष्ट्रातील व्यक्तीला गोव्यात काही दिवसांसाठी प्रवेश नाकारला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. लोबो हे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचा पदभार सांभाळत आहेत.