हकालपट्टी झाल्यानंतर सुचले शहाणपण, आलोक वर्मांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल रात्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीनं सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आज (दुसऱ्याच दिवशी) सीबीआयच्या संचालक पदावरून हटवल्यानंतर आलोक वर्मा यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. मला अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे असे वर्मा यांनी आपल्या राजीनाम्याच्या अर्जात म्हटले आहे. अलोक वर्मा यांची नियुक्ती फायर सर्व्हिस अँड होम गार्डच्या महासंचालकपदी करण्यात आली होती. आज दुपारी वर्मा यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांची मोदी सरकारकडून कालच उचलबांगडी करण्यात आली होती. यासंदर्भात पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांच्या सिलेक्ट कमिटीकडून 2-1 बहुमताने निर्णय घेण्यात आला होता. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा पदावर नियुक्त करताना हा निर्णय सिलेक्ट कमिटीकडे सोपवला होता. सरन्यायाधीशांचे प्रतिनिधी म्हणून न्यायमूर्ती सिकरी या बैठकीला उपस्थित होते. तिघांपैकी केवळ विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांचा बचाव केला होता.

आलोक वर्मा यांची सीबीआय प्रमुख पदावरून हकालपट्टी
न्यायालयाने सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांची नियुक्ती कायम ठेवली होती मात्र सिलेक्ट समितीच्या काल(10 जानेवारी) झालेल्या बैठकीत सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२ डिसेंबर २०१६ ला राकेश अस्थानांची सीबीआयच्या अंतरिम संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ५ डिसेंबर २०१६ ला अ‍ॅडव्होकेट प्रशांत भूषण यांनी राकेश अस्थाना यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्यानंतर १ फेब्रुवारी २०१७ ला आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र २४ ऑगस्ट २०१८ ला आलोक वर्मा यांनी एका उद्योगपतीकडून २ कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांनी थेट केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र पाठवून केला होता. दरम्यान अस्थाना यांच्या या आरोपांची केंद्रीय दक्षता आयोगामार्फत चौकशी करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी सीबीआयने एक विशेष प्रसिद्धीपत्रक जारी करून आलोक वर्मांविरोधातले आरोप प्रतिमा मलीन करण्यासाठी करण्यात आल्याचे म्हंटले होते.
दरम्यान काल (१० जानेवारी) सीबीआयने पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सह संचालक अजय भटनागर, डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, सीबीआय मुख्यालयाच्या प्रशासन विभागाचे उप संचालक पदी अनिश प्रसाद हे कायम राहणार आहेत. तसेच विशेष युनिट क्र.1 च्या के. आर. चौरासिया हे प्रमुखपदी राहणार आहेत.