आर्थिकदृष्टया दुर्बल अंध मुला-मुलींच्या अनोख्या विवाहसोहळयात जुळले रेशीमबंध

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

पुष्पमालांनी सजलेला मंडप… विद्युत रोषणाईचा झगमगाट… सनई-चौघडे आणि मंगलाष्टकांचे मंजूळ स्वर…लग्नघटीका समीप आल्याने भारलेले वातावरण… मोठया हौसेने मामा लोकांनी सजविलेले रुखवत…आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवित अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन बांधव… अशा ह्रदय वातावरणात आयुष्यात प्रकाशाची सोनेरी पहाट घेऊन येणारा हा विवाह सोहळा दोन दृष्टीहिन जोडप्यांनी अंर्तदृष्टीने अनुभविला.

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या दोन अंध मुला-मुलींच्या अनोख्या विवाहसोहळ्याचे. उपक्रमाचे यंदाचे ३ रे वर्ष असून आत्तापर्यंत पाच जोड्यांचा विवाह संपन्न झाला आहे. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पुण्याचे पोलीस सहआयुक्त रविंद्र कदम, कारागृह विभागाचे वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पश्चिम बंगाल विभागाच्या रा.स्व.संघाचे सुनीलपद गोस्वामी, नगरसेवक हेमंत रासने, गणेश समेळ, अशोक येनपुरे, प्रतिभा ढमाले, मंडळाचे शिरीष मोहिते, वैभव वाघ, सचिन ससाणे, उमेश कांबळे, अमर लांडे, अमोल नाईक, गणेश सांगळे यांसह राजकीय, सामाजिक, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

गोव्यातील जिल्हा बसतोराच्या माफसा गावातील संगिता रेड्डी या दृष्टीहिन तरुणीचा विवाह लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतील योगेश वाघमारे या दृष्टीहिन तरुणाशी झाला. संगीता ही गोव्याच्या बसतोरा जिल्ह्याच्या माफसा गावातील असून सध्या दुसºया वर्षात शिक्षण घेत आहे. तर योगेशला आई वडिल नाहीत. तो आठवीपासून लुई ब्रेल अपंग संस्थेत असून संस्थेच्या आॅक्रेस्ट्रामध्ये काम करतो. तसेच, चंद्रपुर जिल्ह्याची मंदा ढगे या दृष्टीहिन तरुणीचा विवाह उस्मानाबादच्या काजळा गावातील शिवाजी शिंदे या तरुणाशी झाला आहे. मंदाला वयाच्या ५ व्या वर्षी चुकीच्या औषधामुळे अंधत्व आले. या अंधत्वावर मात करीत तिने एम.ए चे शिक्षण घेतले असून ती एम.ए. बी.एड. झाली आहे. सध्या ती लुई ब्रेल संस्थेत शिक्षिकेच्या पदावर नोकरी करीत आहे. शिवाजी हा २५ टक्के अंध असून १२ वी पर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे. तो सध्या खासगी कंपनीत कार्यरत आहे.

वधू मंदा ढगे म्हणाली, आज आमचे जीवन खºया अर्थाने प्रकाशमय करण्यामागे सेवा मित्र मंडळ, लुई ब्रेल संस्था आणि पुणेकरांचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या मुलींप्रमाणे प्रेम देऊन आमचा विवाह थाटात करून दिला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत असे ऋण देखील तिने व्यक्त केले.

सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाहसोहळ्याची तयारी सुरु केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. दरबार, पुणे  हे म्युजिकल बँड वरातीमध्ये सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा मोठया उत्साहात पार पडला.